पदवीधर मतदार संघात 835, तर “शिक्षक’साठी 367 केंद्र
पुणे – करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मतदान केंद्रांवर गर्दी होऊ नये, यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने सहाशे ते एक हजार मतदारांसाठी एक मतदान केंद्र करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. त्यानुसार पुणे विभाग पदवीधर मतदार संघात 835, तर शिक्षक मतदार संघात 367 मतदान केंद्र तयार करण्याचे नियोजन निवडणूक निर्णय अधिकारी यांनी घेतला आहे.
यावर्षी पहिल्यांदाच पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात 100 टक्के नव्याने मतदार नोंदणी करण्यात आली. त्यामध्ये निवडणूक आयोगासह जिल्हा निवडणूक प्रशासन आणि सर्वच प्रमुख राजकीय पक्षाने पदवीधर व शिक्षक मतदार संघात मतदार नाव नोंदणीसाठी प्रभावी ऑनलाइन मोहिम राबवली.
याचा चांगलाच परिणाम झाला असून मतदारांची संख्या वाढलेली दिसून येते. त्यामध्ये विभागात दोन्ही मतदार संघात सर्वाधिक मतदार पुणे जिल्ह्यात आहे.