बच्चन यांच्या घराची सुरक्षा वाढवली

मुंबई – अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या मुंबईतील घरांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. काल जया बच्चन यांनी संसदेत चित्रपटसृष्टीवर दुगाण्या झाडणाऱ्या लोकांचा समाचार घेणारे भाषण केले होते. त्यावरून त्यांच्यावर सोशल मीडियात टीका सुरू झाली आहे त्या अनुषंगाने ही दक्षता घेण्यात आली आहे.

अमिताभ यांना आधीच एक्‍स दर्जाची सुरक्षा आहे. त्यांच्या जुहू येथील बंगल्याच्या परिसरात पोलिसांचा फिरता पहाराही वाढवण्यात आला आहे. जुहुत बच्चन कुटुंबीयांचे जलसा, झनक आणि प्रतीक्षा हे तीन बंगले आहेत.

जलसा आणि प्रतीक्षा या बंगल्यांमध्ये बच्चन यांचे वास्तव्य असते. कोणताही अप्रिय प्रकार घडू नये म्हणून ही दक्षता घेतली गेली आहे, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, कंगनाने निर्माण केलेला वाद, जया बच्चन यांचे संसदेतील भाषण यापैकी कोणत्याही विषयावर अजून अमिताभ बच्चन यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अमिताभ बच्चन हे एरवी सोशल मीडियावर चांगलेच ऍक्‍टिव्ह असतात.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.