Chandipura Virus| गुजरातमध्ये एका नव्या विषाणूची लागण झाल्यामुळे सहा मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चांदीपुरा असे या नव्या विषाणूचे नाव आहे. या विषाणुच्या संसर्गाच्या एकूण रुग्णांची संख्या 12 झाली आहे, अशा परिस्थितीत देशातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहे.
या १२ रुग्णांचे नमुने पुष्टीकरणासाठी पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी येथे पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री ऋषिकेश पटेल सोमवारी दिली. पटेल यांनी सांगितले की, १२ रूग्णांपैकी चार साबरकांठा जिल्ह्यातील, तीन अरावली, महिसागर आणि खेडा येथील प्रत्येकी एक, तर दोन रुग्ण राजस्थान आणि एक मध्य प्रदेशातील आहेत. त्यांच्यावर गुजरातमध्ये उपचार करण्यात आले.
साबरकांठा जिल्ह्यातील हिंमतनगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सहा पैकी पाच मृत्यूची नोंद झाली आहे. साबरकांठा येथील सिव्हिल हॉस्पिटलमधील आठ रुग्णांसह सर्व १२ नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे पाठवण्यात आले आहेत,त्याचा निष्कर्ष रिपोर्ट लवकरच अपेक्षित आहे. चांदीपुरा विषाणू संसर्गजन्य नाही. बाधित भागात सखोल पाळत ठेवण्यात आली आहे, असे मंत्र्यांनी सांगितले.
चांदीपुरा व्हायरस नेमका काय आहे?
यासंबंधित पहिले प्रकरण महाराष्ट्रात 1966 मध्ये नोंदवले गेले. नागपूरच्या चांदीपूरमध्ये या विषाणूची ओळख पटली, म्हणून त्याला चांदीपुरा व्हायरस असे नाव देण्यात आले. त्यानंतर 2004 ते 2006 आणि 2019 मध्ये आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये हा विषाणू आढळून आला. चांदीपूर विषाणू हा आरएनए विषाणू आहे, जो बहुधा मादी फ्लेबोटोमाइन माशीद्वारे पसरतो.
या विषाणूचा सर्वाधिक बळी १५ वर्षांखालील मुले आहेत. या वयातील मुलांमध्ये मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. चांदीपुराच्या उपचारासाठी अद्याप कोणतेही अँटी-व्हायरल औषध बनलेले नाही.
चांदीपुरा व्हायरसची लक्षणे कोणती?
चांदीपुरा विषाणूमुळे रुग्णाला ताप येतो. यात फ्लूसारखी लक्षणे आणि गंभीर एन्सेफलायटीस आहे. एन्सेफलायटीस हा एक आजार आहे ज्यामुळे मेंदूला सूज येते.
हेही वाचा:
अमेरिकेचे उपराष्ट्रपती यांचं भारताशी आहे,’खास कनेक्शन’