पुणे – कॅन्टोन्मेंट परिसरात अपार्टमेंटपासून वस्त्यांपर्यंत सर्व ठिकाणी करोनाबाधित आढळून येत असून, परिसरातील स्थिती गंभीर होत आहे. त्यामुळे या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आता पोलिसांची कठोर पेट्रोलिंग आणि दंडात्मक कारवाईचा मार्ग बोर्डातर्फे अवलंबण्यात आला आहे.
लष्कर परिसरातील मोदीखाना, भीमपुरा, घोरपडी गाव, सोलापूर बाजार, फातिमानगर, भीमपुरा, साचापीर स्ट्रीट, दस्तूर मेहेर रस्ता या आठ भागांत करोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने तेथील तीन किलोमीटरच्या परिघात प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहे. या प्रतिबंधित क्षेत्राबाहेर करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी बोर्डातर्फे प्रतिबंधित क्षेत्राची विभागणी केली आहे.
परिसरातील आठ प्रतिबंधित क्षेत्रांची (कंटेन्मेंट झोन) सहा विभागात (सेक्टर) विभागणी, प्रत्येक विभागातील सत्तर ते शंभर घरांच्या ब्लॉकमागे दोन सुरक्षारक्षक, दोन स्वच्छता कर्मचाऱ्यांची नेमणूक, प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना घरापाशी भाजीपाला, शिधा आदी वस्तू उपलब्ध करून देण्यासाठी स्वयंसेवकांच्या नियुक्त्या, बोर्ड, लष्कर पोलीस ठाणे आणि स्थानिक लष्करी प्रशासनाचे पेट्रोलिंग अन् सुरक्षित वावराचे निकष न पाळणाऱ्या व्यक्ती, दुकानांवर दंडात्मक कारवाई, अशा नियोजनाच्या जोरावर पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाने लष्कर परिसरातील करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कंबर कसली आहे.
या विभागात सध्या आठ स्वयंसेवक नेमले असून, आणखी 24 स्वयंसेवकांना विशेष पास देण्यात येणार आहे. त्यासोबतच चाळीस सुरक्षारक्षक आणि सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्यावर सुरक्षित वावर आणि स्वच्छता राखण्याची जबाबदारी देण्यात आली आहे, अशी माहिती बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुमार यांनी दिली.