लेखा पथकाच्या सूचनेनंतर खासगी रुग्णालयांकडून 1 कोटींची बिलं कमी
पुणे – खासगी रुग्णालय प्रशासनास वारंवार सूचना देऊनही वाढीव बिले रुग्णांच्या हाती देण्याचे प्रकार शहरासह ग्रामीण भागात सुरुच आहेत. मागील 20 दिवसांमध्ये खासगी रुग्णालयांमधील दीड लाख रुपयांवरील बिलांची तपासणी केली असता यामध्ये तब्बल 1 कोटी 3 लाख 99 हजार रुपयांचे जादा बिल समाविष्ट केल्याचे समोर आले आहे. त्यानुसार लेखा पथकाने दिलेल्या सूचनेनुसार खासगी रुग्णालयांनी ही 1 कोटी 3 लाख वाढीव बिले कमी केली आहेत.
करोना रुग्णांकडून अवाजवी बिले आकारण्याच्या गैरप्रकारला आळा बसण्यासाठी खासगी हॉस्पिटलनी दिलेल्या दीड लाख रुपयांवरील रकमेच्या बिलांची पूर्व तपासणी करण्याचा निर्णय विभागीय आयुक्तांनी घेतला. त्यासाठी शहरातील 30 हॉस्पिटलसाठी बिलांचे लेखापरीक्षण करण्यासाठी पथके स्थापन करण्यात आली. महापालिकेतील लेखा विभागातील अधिकाऱ्यांची यासाठी नियुक्ती करण्यात आली.
दीड लाखांपेक्षा अधिकचे बिल हे हॉस्पिटलकडून लेखापरीक्षण पथकाला दिले जाते. या बिलांची तपासणी केल्यानंतर जादा दर आकारण्यात आले असेल तर त्याबाबतचे म्हणणे रुग्णालयांकडून मागविले जाते. आकारलेले बिल योग्य असल्याची खात्री झाल्यानंतर ते बिल रुग्णांना अथवा नातेवाईकांना दिले जाते.
यामध्ये ही बाब समोर आली. पुणे जिल्ह्यात वाढीव बिलाच्या एकूण 407 तक्रारी आल्या होत्या. या 407 बिलांची एकूण 6 कोटी 73 लाख 31 हजार 515 रुपये होती. या सर्व सर्व बिलांची छाननी लेखा पथकांकडून करण्यात आली. त्यामध्ये 1 कोटी 3 लाख रुपयांचे जादा बिल रुग्णालयाने आकारल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार ही जादा बिले रुग्णांच्या बिलातून कमी करण्यात आली आहे.