नऊ महिन्यांत कोट्यावधीनी महसूल वाढला : एकूण 518 कोटींचा महसूल जमा
पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी विभागास बांधकाम परवानगी शुल्कातून डिसेंबर अखेर 517 कोटी 56 लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. मागील वर्षीच्या उत्पन्नापेक्षा आठ कोटीने उत्पन्न आधिक आहे.
महारेरा प्रकल्पाअंतर्गत प्रत्येक नव्या बांधकामाची नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांना आपल्या बांधकामाची महापालिकेकडून परवानगी घेणे बंधनकारक आहे. तसेच बांधकामास परवानगी दिल्यानंतर ठराविक शुल्क महापालिकेला द्यावे लागते. शहरामध्ये अनेक ठिकाणी मोठ-मोठ्या इमारतींचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात भर पडली आहे. सन 2017-18 या वर्षी महापालिकेस 455 कोटी रुपये उत्पन्न मिळाले होते.
मागील वर्षी यामध्ये वाढ होऊन 2018-19 या वर्षी 509 कोटी उत्पन्न मिळाले होते. तर यंदाच्या वर्षी 2019-20 या अर्थिक वर्षात 31 डिसेंबर अखेर 517 कोटी 56 लाखांचा महसूल महापालिकेला मिळाला आहे. त्यातील 468 कोटी 16 लाखांचे उत्पन्न मुख्य फंडातून मिळाले आहे. तर, 49 कोटी 40 लाखांचे उत्पन्न युटीएफ फंडातून महापालिकेला मिळाला आहे.
सध्या बांधकाम परवानगी विभागामार्फत चांगले उत्पन्न मिळत आहे. सध्याची बांधकाम परवानगी प्रक्रिया अशीच सुरू राहिली तरी अर्थिक वर्षाच्या शेवटपर्यंत हा आकडा सातशे कोटींच्या जवळ जाईल.
– राजन पाटील, सह शहर अभियंता, पिं.चिं. महापालिका.