तडजोडीसाठी ग्राहकांची गर्दी : नियमांचा फज्जा
पुणे – लॉकडाऊनमुळे मीटर रीडिंग न घेता ग्राहकांना तीन महिन्यांचे सरासरी वीज बिल दिले आहे. ज्यांनी वीज वापरली नाही, त्यांनाही भरमसाठ बिल आले आहे. आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या ग्राहकांसमोर वीज बिलाचे आणखी एक संकट उभे राहिले आहे.
यावर ग्राहकांचे समाधान करण्याचा पवित्रा महावितरणने घेतला आहे. पण, जवळपास सर्वच कार्यालयांत ग्राहकांची गर्दी होत आहे. त्यामुळे नियमांचा पुरता फज्जा उडाला आहे.
करोनामुळे प्रत्यक्ष रीडिंग न घेता, सरासरी बिल देण्यात आले. परंतू, हे बिल प्रत्यक्ष वीज वापरापेक्षा कित्येकपटीने अधिक आहेत. जे व्यक्ती लॉकडाऊनमध्ये घर बंद करून गावी गेले होते, त्यांनाही वीजबिल आले आहे. अतिरिक्त व विनावापर चढ्यादराने बिलाची रक्कम आकारणे अन्यायकारक आहे. यामुळे तीव्र असंतोषाची भावना असून नागरिकांचा उद्रेक होत आहे. महावितरण कार्यालयात नागरिक गर्दी करू लागले आहेत.
…तर आंदोलन करू
प्रत्येक वीज ग्राहकाला “वाढीव’ बिल आले आहे. या प्रश्नावर पद्मावती येथील महावितरण कार्यालयास आमदार भीमराव तापकीर यांनी भेट दिली. सक्तीने वसुली न करता रीडिंगच्या आधारे बिल द्यावे. समस्येचे तात्काळ निवारण झाले नाही, तर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा तापकीर यांनी दिला. यावेळी नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.