पॅकिंग केलेले अन्नपदार्थही महागणार
नवी दिल्ली – जीएसटी कौन्सिलच्या निर्णयामुळे सोमवारपासून ग्राहकांना आटा, पनीर आणि दही यांसारख्या प्री-पॅक केलेल्या, लेबल केलेल्या खाद्यपदार्थांवर 5 टक्केजीएसटी भरावा लागणार आहे. नव्याने लागू करण्यात आलेला जीएसटी सोमवारपासून लागू होणार असल्याने अनेक वस्तू आणि सेवा महागणार आहेत. पूर्वी ज्या वस्तूंवर जीएसटी नव्हता त्या वस्तूंवरही आता हा कर लागू होणार असून, काही वस्तूंवरील जीएसटी पूर्वीपेक्षा जादा दराने लागू केला जाणार आहे.
प्रतिदिन एक हजार रुपये भाडे असलेल्या हॉटेल खोल्या, नकाशे आणि चार्ट, अशा बाबींवर 12 टक्केदराने जीएसटी लागू होईल तर टेट्रा पॅकवर 18 टक्के दराने जीएसटी आकारला जाणार असल्याने टुथपेस्ट आणि खोबरेतेल यांसारख्या सर्वसामान्यांच्या दैनंदिन वापरावरील वस्तूही महागणार आहेत. बॅंकांतर्फे जारी केल्या जाणाऱ्या चेक बुकांवरही आता जीएसटी लागू होणार आहे.
गेल्या महिन्यात, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत विविध वस्तू आणि सेवांवरील करांचा फेरआढावा घेण्यात आला होता. त्यात हे वाढीव कर लागू केले गेले आहेत. अन्नपदार्थांवरील जीएसटीच्या विरोधात व्यापाऱ्यांनी काल देशभर बंद पाळला होता. पण तरीही सरकारने या आंदोलनाची अजून दखल घेतलेली नाही.
छपाई, लेखन किंवा रेखांकन वापरली जाणारी शाई यांसारख्या उत्पादनांवरील कर दर, कटिंग ब्लेडसह चाकू, पेपर चाकू, पेन्सिल शार्पनर, एलईडी दिवे, ड्रॉइंग आणि मार्किंग आउटची साधने अशा वस्तूंवरील जीएसटी 12 टक्क्यांवरून 18 टक्केइतका करण्यात आला आहे. सोलर वॉटर हिटरवर पूर्वी 5 टक्क्यांच्या तुलनेत आता 12 टक्केजीएसटी लागेल. रस्ते, पूल, रेल्वे, मेट्रो, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि स्मशानभूमी यांसारख्या प्रकल्पांवरही वाढीव दराने जीएसटी लागू केला जाणार आहे.