पुणे – पाणीपट्टीत 15 टक्‍के वाढीस मान्यता

रद्द करण्याची विरोधकांची मागणी : 20 विरोधात 78 मतांनी प्रस्ताव मंजूर

पुणे – समान पाणीपुरवठा योजनेसाठीचा खर्च भरून काढण्यासाठी मिळकतकरातील पाणीपट्टीत 15 टक्‍के वाढ करण्यास महापालिकेच्या मुख्यसभेत मान्यता देण्यात आली. शहरात पाणीकपात असल्याने तसेच पालिकेकडून ही योजना केंद्र व राज्य शासनाच्या मदतीसह कर्जरोखे काढून केली जाणार असल्याने यावर्षी ही वाढ करू नये, अशी उपसूचना विरोधीपक्षांनी देत ही करवाढ रद्द करण्याची मागणी केली. मात्र, सत्ताधारी भाजपकडून ही उपसूचना फेटाळत, ही करवाढ मान्य करण्यात आली. तसेच ही करवाढ 2016 पासून बंधनकारक असल्याने ती करावी लागणार असल्याचे सत्ताधाऱ्यांकडून मुख्यसभेत स्पष्ट करण्यात आले.

महापालिकेकडून शहरात समान पाणी योजना राबविण्यात येणार आहे. यासाठी तब्बल 2,500 कोटींचा खर्च येणार असल्याने महापालिकेने पाणीपट्टीत 100 टक्‍के करवाढ प्रस्तावित केली होती. त्यास 2016 मध्ये मान्यताही देण्यात आली आहे. मात्र, ही दरवाढ एकाचवेळी न करता त्यात टप्प्याटप्प्याने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, पहिली पाच वर्षे प्रत्येकी 15 टक्‍के, तर शेवटच्या वर्षी 25 टक्‍के वाढ केली जाणार आहे. त्यानुसार, 2017 पासून दरवर्षी पाणीपट्टीत 15 टक्‍के वाढ केली जात असून 2019-20 या आर्थिक वर्षातही 15 टक्‍के वाढीसह मिळकतकरातही 12 टक्‍के वाढ प्रस्तावित केली होती. स्थायी समितीने मिळकतकरातील वाढ फेटाळत पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव मुख्यसभेत ठेवला होता.

हा प्रस्ताव चर्चेसाठीच येताच, भाजप वगळता सर्व पक्षांनी त्यास विरोध केला. शहरात पाण्याची कमतरता आहे, अशा स्थितीत एका बाजूला पुणेकरांना पाणी मिळत नाही, असे असताना करवाढ करू नये अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक पृथ्वीराज सुतार, नाना भानगिरे, पल्लवी जावळे, कॉंग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे, राष्ट्रवादीचे योगेश ससाणे, गफूर पठाण यांनी केली. तसेच प्रशासनाने थकबाकी वसूलीवर भर दिल्यास ही करवाढ करण्याची गरज भासणार नसल्याचे सांगितले. तसेच, करवाढ रद्द करण्यासाठी उपसूचना दिली. मात्र, भाजपने या उपसूचनेस विरोध केल्याने त्यावर मतदान झाले असता. 77 विरोधात 20 मतांनी ती फेटाळण्यात आली. त्यानंतर करवाढीचा विषय मान्यतेस आल्यानंतर विरोधीपक्षांनी त्यास विरोध केला. त्यामुळे पुन्हा मतदान होऊन 20 विरोधात 78 मतांनी 15 टक्‍के करवाढीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. या करवाढीमुळे महापालिकेस 2019-20 मध्ये समान पाणी योजनेसाठी 28 कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे.

प्रशासनाने सुचविलेली करवाढ ही पुणेकरांवर लादलेला जिजिया कर आहे. प्रशासनाकडून पाणीपट्टीत वाढविण्यात येणाऱ्या या करामुळे भविष्यात मिळकतकरातील इतर करांच्या तुलनेत पाणीपट्टी 200 पटींनी अधिक होईल. एका बाजूला या योजनेसाठी कर्ज काढलेले असताना, तसेच केंद्राच्या व राज्याच्या अनुदानातून ती राबविली जात असताना, ही दरवाढ तातडींने मागे घ्यावी.
– अरविंद शिंदे, कॉंग्रेस, गटनेता


केवळ पैसा उभारण्यासाठी पुणेकरांवर करवाढ करू नये. प्रशासनाला उत्पन्नवाढीची इतरही साधणे आहेत. मात्र, त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. शासनाकडे सुमारे साडेचारशे कोटींची थकबाकी असताना, शहरातील भाजपचा एकही आमदार अथवा खासदार त्यासाठी पाठपुरावा करत नाही. मात्र, दुसऱ्या बाजूला अवघ्या 28 कोटींच्या निधीसाठी पुणेकरांवर बोजा टाकत आहे. त्यामुळे तातडीने ही दरवाढ रद्द करावी.

– वसंत मोरे, गटनेता, मनसे


महापालिकेला नागरिकांना पुरेसे पाणी देता येत नाही तर पुणेकरांवर कराचा बोजाही टाकू नये. मुख्यमंत्री वारंवार पुण्याला पाणी कमी पडू देणार नसल्याचे सांगतात, तर दुसऱ्या बाजूला अघोषीत कपात सुरू आहे. केवळ सत्ताधाऱ्यांना पाण्याचे नियोजन करता येत नसल्याने ही स्थिती असून आधी पाणी द्यावे मगच करवाढ करावी.

– संजय भोसले, शिवसेना गटनेता


सत्ताधाऱ्यांकडून स्वत:चे अपयश झाकण्यासाठी ही करवाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. महापालिकेचे उत्पन्नाचे स्त्रोत घटत आहेत. अशा स्थितीत काही कोटी रुपयांसाठी सत्ताधारी पुणेकरांवर करवाढ लादत आहेत. ही चुकीची बाब असून आधी पुरेसे पाणी द्यावे, समान पाणी योजनेचे काम पूर्ण होऊ द्यावे त्यानंतरच करवाढ करावी.

– दिलीप बराटे, विरोधीपक्षनेते


समान पाणी योजना 2016 मध्ये मंजूर करण्यात आली आहे. त्यावेळी या योजनेस सध्या विरोधात असलेल्या राजकीय पक्षांनी पाठींबा दिला होता. त्यामुळे दरवर्षी ही वाढ करणे बंधनकारक आहे. या उलट प्रशासनाने मिळकतकरात केलेली 12 टक्‍के दरवाढ आम्ही फेटाळून लावत पुणेकरांना दिलासा दिला आहे. ही योजना होणे शहरासाठी महत्त्वाचे आहे.

– श्रीनाथ भिमाले, सभागृह नेते

Leave A Reply

Your email address will not be published.