पुणे – हेल्थकेअर वर्कर्सनंतर आता “फ्रंटलाइन वर्कर्स’च्या लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने महापालिकेचे सर्व विभाग, शिक्षण मंडळ आणि पीएमपीएमला पत्र पाठवून “कोविन ऍप’वर नोंदणी केलेल्या कर्मचाऱ्यांना लसीकरण करून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात करोनाविरोधी लढाईत अग्रभागी राहून काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना लस देण्यात येत आहे. त्यामध्ये महापालिका आणि पीएमपीच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. लस घेण्यासाठी “को-विन ऍप’वर शहरातील 57 हजार 264 “फ्रंटलाइन वर्कर्स’ने नोंदणी केली आहे. त्यामधील सुमारे पाच हजार जणांनीच लस घेतली आहे. त्यामुळे फ्रंटलाइन वर्कर्सच्याही लसीकरणाचा वेग कमी असल्याचे निदर्शनास येत आहे.
या संदर्भात सहायक आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली जाधव यांनी महापालिकेच्या सर्व विभागप्रमुखांना, क्षेत्रीय कार्यालय सहायक आयुक्त, शिक्षण मंडळ अधिकारी आणि पीएमपीच्या व्यवस्थापकीय संचालकांना पत्र दिले आहे.
कर्मचाऱ्यांना मोबाइलवर संपर्क करून त्यांना लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे असे पत्राद्वारे सूचित करण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी 27 केंद्रांवर सोय केली असून, कोविन ऍपवर नोंदणी केलेल्या कर्मचाऱ्यांनी त्या केंद्रांवर जाऊन लस घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.