शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) सह परिसरात दररोज वेगवेगळ्या ठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असताना आता आज पुन्हा कोरेगाव भीमात 4, शिक्रापुरात 2 तर सणसवाडीत 1 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असल्याची माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शिंदे यांनी दिली आहे.
शिक्रापूरसह आजूबाजूच्या सणसवाडी, कोरेगाव भीमा यांसह आदी गावांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या सोसायटीमध्ये दररोज नियमितपणे कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याने परिसरात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. काही ठिकाणी एकाच घरातील 5 पेक्षा जास्त लोकांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.
शिक्रापूर येथे आज पुन्हा मोती चौक परिसरातील दोन वेगवेगळ्या बिल्डिंगमध्ये 2 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर सणसवाडी मध्ये 1 तर तब्बल 5दिवसांनंतर कोरेगाव भीमा मध्ये कोरोनाचा शिरकाव झाला असून एका कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा पती कोरोना पॉझिटिव्ह आला असून तीन वेगवेगळ्या ठिकाणच्या तिघांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
शिक्रापूर व सणसवाडी परिसरातील कोरोनाबाधित नवीन रुग्णांची माहिती मिळाल्यानंतर आरोग्य पर्यवेक्षक जालिंदर मारणे व आरोग्य सेवक एस. एस. चोपडा, आरोग्य सेविका जनाबाई शिरसाठ व त्यांच्या सहकाऱ्यांनी सदर रुग्ण राहत असलेल्या परिसरात जाऊन ग्रामपंचायतच्या माध्यमातून औषध फवारणी करत परिसर निर्जंतुकीकरण केले असून शिक्रापूर येथील दोन रुग्णांच्या संपर्कातील 10 तर सणसवाडी येथील रुग्णाच्या संपर्कातील 9 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले.
कोरेगाव भीमा येथील कोरोनाबाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती काढण्याचे काम आरोग्य विभागाच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. तसेच नागरिकांनी योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन देखील आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तर तळेगाव ढमढेरे गावामध्ये आठवडाभर रुग्ण आढळून येत असताना आता तळेगाव ढमढेरे गावाला थोडी विश्रांती मिळाली असल्यामुळे तेथील नागरिक समाधान व्यक्त करत आहे.