भैरवनाथच्या खोलीकरणामुळे पाणीसाठ्यात वाढ

पावसाळा संपताच सुशोभीकरणाचे काम सुरू ःवाघोलीकरांचा काही प्रमाणात पाणीप्रश्‍न सुटणार
वाघोली (प्रतिनिधी) – गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे वाघोली येथील भैरवनाथ तळ्याच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

पाणीटंचाईच्या काळात पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागणार आहे. भूजलपातळी वाढणार असून परिसरातील बोअरवेल, विहिरींचे पाणी वाढणार आहे. त्यामुळे वाघोलीकरांचा काही प्रमाणात पाण्याचा प्रश्‍न सुटणार आहे. वाघोली येथील वाघेश्‍वर मंदिर, भैरवनाथ मंदिर व कुंभार तलावाचे वाघोली व पीएमआरडीएच्या माध्यमातून खोलीकरणासह रुंदीकरणाचे काम करण्यात आले. भैरवनाथ तलावाच्या खोलीकरणामुळे मोठ्या प्रमाणात पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

वाघोलीमध्ये पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जल नियोजन करणे हे महत्वाचे झाले होते. सद्यस्थितीत व भविष्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी वाघोलीमध्ये असलेल्या तीन तळ्यांचे खोलीकरण व रुंदीकरण केल्यास हा प्रश्‍न मार्गी लागू शकते. यादृष्टीने जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे, माजी उपसरपंच रामकृष्ण सातव यांनी तत्कालीन पालकमंत्र्यांसह आमदार बाबुराव पाचर्णे व पीएमआरडीएचे तत्कालीन आयुक्‍त यांच्याकडे निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली होती.

नागरिकांचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न असल्यामुळे माजी पालकमंत्री गिरीष बापट व तत्कालीन आयुक्‍त किरण गीते यांनी सकारात्मकता दाखवत तात्काळ तळ्याच्या विकास आराखड्याचा प्रस्ताव पाठवायला सांगितला होता. प्रस्ताव पाठवल्यानंतर पीएमआरडीएकडून वाघोली येथील भैरवनाथ तलावासाठी 3 कोटी 99 लाख मंजूर करण्यात आले होते. त्यानंतर ग्रामपंचायत व पीएमआरडीच्या निधीमधून तळ्याच्या खोलीकरणाच्या कामाला सुरवात करण्यात आली होती. तिन्ही तळ्याचे खोलीकरण व रुंदीकरणामुळे पाणीसाठ्यात वाढ झाल्यामुळे टंचाईच्या काळात गावाला पुरेल एवढी क्षमता निर्माण होईल. भूगर्भात पाण्याची पातळी वाढून गावातील बोअरवेल व विहिरींना कायमस्वरूपी पाणी मिळणार आहे.
दहा एकरात करणार सुशोभीकरण
भैरवनाथ तळ्याचे क्षेत्रफळ साधारणतः 35 एकर असून 25 एकर असणाऱ्या पाण्याच्या क्षेत्रात 10 एकरात सुशोभीकरण करण्यात येणार आहे. अजून भैरवनाथ तळ्याचे सुशोभीकरणाचे काम बाकी आहे. खोलीकरणामुळे पाणीसाठा वाढणार आहे. मासे, कासव आदींसारख्या जलचर प्राण्यांसह परिसरातील विहिरींना, कूपनलीकांना याचा लाभ होणार आहे. वाघेश्‍वर मंदिर, भैरवनाथ मंदिर अशा दोन्ही धार्मिकस्थळांना तलाव आहेत. सुशोभीकरणानंतर ही दोन्ही तलाव पर्यटनस्थळे ठरणार आहेत.

पावसाळा संपल्यावर साधारणतः 15 एकरमध्ये सीमाभिंत, जॉगिंग ट्रॅक आदी सुशोभीकरणाचे काम सुरू करण्यात येईल
-रामकृष्ण सातव, ग्रामपंचायत सदस्य, वाघोली

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)