पुणे – मागील काही दिवसांपासून उकाड्यात वाढ होत आहे. शुक्रवारी अंशत: ढगाळ वातावरण झाल्याने दुपारनंतर अधिक उकाडा जाणवत होता. याचबरोबर सर्वात कमी किमान तापमान पुण्यात नोंदविले असून, शुक्रवारी सकाळी 14.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. एकीकडे उन्हाळ्याची चाहूल होत असतानाच पहाटे गारवा, दिवसा उन्हाचा चटका आणि रात्री उकाडा असे विचित्र हवामान नागरिक अनुभवत आहेत.
उत्तर-मध्य महाराष्ट्रावर चक्रिय चक्रवात तयार झाले आहे. मागील 24 तासांत कोकण, गोवा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे होते.
विदर्भाच्या बऱ्याच भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली आहे. तर, मराठवाड्याच्या काही भागांत, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्राच्या तुरळक भागात किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. मराठवाड्याच्या काही भागांत आणि मध्य महाराष्ट्र, विदर्भाच्या तुरळक भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. तर, राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते.
पुणे @ 37 अंश सेल्सिअस
शुक्रवारी सकाळी पुणे येथे 37 अंश सेल्सिअस कमाल आणि 14.5 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले आहे. तर, लोहगाव येथे 37 अंश सेल्सिअस कमाल आणि 17.6 अंश सेल्सिअस किमान तापमान, पाषाण येथे 37.3 अंश सेल्सिअस कमाल आणि 15.5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.