ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकारात होतेय वाढ..!

– एखादी चूकही पडू शकते महागात
– आठ महिन्यांत 56 गुन्ह्यांची उकल

पिंपरी – एका क्‍लिकवर सर्वकाही मिळवून देणाऱ्या या युगात अपुऱ्या ज्ञानाचा आणि थोड्याशा निष्काळजीपणाचा मोठा फटका बसू शकतो. गेल्या काही वर्षांमध्ये ऑनलाईन गंडा घालण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. वेगवेगळ्या क्‍लृप्त्या लढवून ऑनलाईन फसवणूक होत आहे. दाखल झालेल्या गुन्ह्यांपैकी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलने गेल्या आठ महिन्यांत अशा 56 गुन्ह्यांची उकल केली आहे. तर लुबाडलेले सुमारे 27 लाख 16 हजार 643 रुपये परत मिळवून दिले आहेत.

कधी क्रेडिट किंवा डेबिट कार्ड अपडेट करावयाचे असल्याचे सांगून तर कधी ऑनलाईन लॉटरीच्या बहाण्याने तर कधी ई-कॉमर्स साईटवर शॉपिंग करताना गंडा घातला जातो. व्यक्तीगत माहिती फोनवरून उपलब्ध करून देऊ नका असे आवाहन बॅंका, पोलीस, रिझर्व्ह बॅंक सातत्याने करत असतानाही ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढत असल्याची बाब गंभीर बनली आहे.

ऑनलाईन खरेदी करताना घ्यावयाची काळजी

ऑनलाइन शॉपिंग केल्यानंतर काही समस्या आल्यास संबंधितांकडून त्याचे निवारण करण्यासाठी काही यंत्रणा आहे का, याची खात्री ग्राहकांनी करून घेणे आवश्‍यक आहे. ज्या वेबसाइटवरून खरेदी करणार आहात, त्या वेबसाइटच्या सर्वांत खालच्या ठिकाणी व्हेरी साइन ट्रस्टेड अशा पद्धतीचं सर्टीफिकेट त्या वेबसाइटवर दिलेले आहे किंवा नाही हे आधी तपासून पहा. सध्या विविध वेबसाइट ऑनलाइन विक्रीच्या क्षेत्रात उतरल्या आहेत.

मात्र, या वेबसाइट ई-कॉमर्सच्या नियमानुसार सुरू करण्यात आलेल्या आहेत किंवा नाहीत, हे आधी तपासून पाहणे आवश्‍यक आहे. आर्थिक तपशील भरताना काळजी घ्यावी. आपल्या बॅंकेच्या वेबसाइटची लिंक खरी आहे का, हे तपासून पहावे. खरेदी झाल्यानंतर आलेले ई-बिल तपासून घ्यावे, त्याची कॉपी सेव्ह करून ठेवावी. आपल्या बॅंकेशिवाय आणि ऑनलाइन खरेदी कंपनीशिवाय इतर कोणत्याही मध्यस्थ ऑनलाइन वेबसाइटवरून आर्थिक व्यवहार करू नयेत.

“नागरिकांना आपल्या एटीएमचा पिन नंबर, तसेच सीसीव्ही नंबर कोणालाही दिला नाही तर ऑनलाईन फसवणूक टाळता येऊ शकते. शिवाय बल्क एसएमएस पाठवून फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे मेसेजमध्ये दिलेल्या लिंक उघडू नयेत. तसेच आवश्‍यक असलेलीच ऍप्लिकेशन डाऊनलोड करावीत. अनावश्‍यक ऍप्लिकेशन डाऊनलोड करु नये. थोडीशी काळजी घेतल्यास ऑनलाईन फसवणूक होणार नाही.
– सुधाकर काटे, पोलीस निरीक्षक, पिंपरी-चिंचवड

फसवणुकीचे प्रकार

पिंपरी-चिंचवड शहरात स्वतंत्र आयुक्‍तालयाची स्थापना झाल्यानंतर ऑनलाईन फसवणूक करणाऱ्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सायबर सेलच्या माध्यमातून करण्यात येत आहे. स्वतंत्र आयुक्‍तालय स्थापन झाल्यानंतर आठ महिन्यात मोठ्या प्रमाणात ऑनलाईन फसवणुकीच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. या तक्रारीच्या मुळाशी जात सायबरसेलनेही आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

आत्तापर्यंत सायबर सेलने वेगवेगळ्या प्रकरणात 27 लाख 16 हजार 643 रुपये रिफंड केले आहेत. यामध्ये बॅंक अधिकारी बोलतोय, लॉटरी लागली, रिवॉर्ड पॉईंट मिळाले, गिफ्ट लागले, ओटीपी शेअर करण्यास सांगून पैसे काढणे, फेक वेबसाईट बनवून तसेच वेगवेगळ्या पेमेंट गेटवे व मर्चंटचा वापर करावयास लावून फसवणूक केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. अशा 56 तक्रारींचा तपास करुन हे पैसे सायबर सेलने मिळवून दिल्याची माहीती सायबर सेलचे पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी दिली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)