आगामी काळात आणखी वाढ होण्याची शक्यता : अधिकाऱ्यांची माहिती
पुणे – नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत देशभरात झालेल्या डिजिटल व्यवहारांची संख्या तब्बल 2 हजार 100 कोटी इतकी झाली आहे. गेल्या वर्षी पूर्ण वर्षांमध्ये 3 हजार 134 कोटी डिजिटल व्यवहार झाले होते. चालू आर्थिक वर्षाच्या उरलेल्या काळातही डिजिटल व्यवहार वाढण्याची शक्यता आहे.
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की 2016-17 पासून डिजिटल व्यवहारांमध्ये उत्तरोत्तर वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. नोटाबंदी आणि त्यानंतर सरकारने केलेल्या प्रयत्नामुळे हे सर्व शक्य झाले आहे.
2016-17 मध्ये केवळ 1हजार 4 कोटी डिजिटल व्यवहार झाले होते. त्यानंतर सरकारने आणि रिझर्व्ह बॅंकेने अनेक पातळ्यांवर प्रयत्न सुरू केले आहेत. परिणामी, 2017-18 मध्ये 2 हजार 78 कोटी इतक्या डिजिटल व्यवहाराची नोंद झाली. त्यामध्ये 74 टक्के वाढ झाली होती. चालू वर्षात आतापर्यंतच 2 हजार 100 इतक्या डिजिटल व्यवहाराची नोंद झालेली आहे. उरलेल्या वर्षात आणखी व्यवहार होण्याची शक्यता आहे. 2018-19 मध्ये 3 हजार 134 कोटी डिजिटल व्यवहाराची नोंद झाली होती.
त्याचबरोबर अधिकाऱ्यानी सांगितले, की सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क योजनेअंतर्गत 2 हजार 306 युनिट कार्यरत आहेत. तर इलेक्ट्रॉनिक हार्डवेअर टेक्नॉलॉजी पार्क या योजनेअंतर्गत 70 युनिट कार्यरत आहेत. आयात कमी करण्यासाठी या योजना सरकारने चालू केलेल्या आहेत. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क मधून गेल्या वर्षी चार लाख 17 हजार कोटी रुपयांची निर्यात झाली. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक हार्डवेअर टेक्नॉलॉजी पार्कमधून 7,611 कोटी रुपयांची निर्यात झाली आहे.