टोकियो – टोकियो ऑलिम्पिकसाठी दाखल झालेल्या विविध संघांत करोनाने एन्ट्री केल्याचे चित्रच सध्या दिसू लागले आहे. जपानचे नागरिक एकीकडे स्पर्धेला सातत्याने विरोध करत आहेत. स्पर्धा घेण्याच्या प्रयत्नात रोज एकेकाचा नंबर लागत आहे, आता तरी जागे व्हा, अशी आर्त साद आता नागरिक घालत आहेत.
ऑलिम्पिक सुरू होण्यास केवळ चार दिवस बाकी असतानाच चेक प्रजासत्ताक, रशिया आणि दक्षिण आफ्रिका संघातील खेळाडूला करोनाची बाधा झाल्याचे समोर आल्यानंतर टोकियोतील विविध मैदानांच्या बाहेर स्पर्धेला विरोध करत नागरिक निदर्शनेही करत आहेत. या स्पर्धेच्या तयारीत जपान सरकारसह आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समितीने (आयओसी स्पर्धेची ग्वाही दिली असून सर्व प्रकारची काळजी घेतली जाणार असल्याचेही सांगितले आहे. दररोज एक नवा करोनाबाधित आढळून येत असताना स्पर्धेचा अट्टहास कशासाठी असा प्रश्नही नागरिकांनी विचारला आहे.
चेक संघाच्या बीच व्हॉलीबॉल संघातील खेळाडू ओंद्रेज पेरूसी याला करोनाची बाधा झाली आहे. त्याची कोविड-19 चाचणी केल्यानंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. चेक संघाचा करोनाबाधित झालेला हा दुसरा खेळाडू आहे. याच धोक्यामुळे होणारी ही स्पर्धा एक वर्षे पुढे ढकलली गेली व आता त्याची सुरुवात होत आहे. मात्र, यंदाही करोना बाधितांचा आकडा वाढत असल्याने जपान सरकारसह आयोजकांचीही डोकेदुखी वाढली आहे.
सर्व प्रकारची काळजी घेतल्यानंतरही बीच व्हॉलीबॉल संघाचा खेळाडू ओंद्रेज पेरूसीच याला करोनाची बाधा झाली असली तरीही त्याच्यात कोणतीही लक्षणेही दिसली नव्हती, असे स्पष्टीकरण चेक संघाच्या व्यवस्थापकांनी दिले आहे. चेक संघासह दक्षिण आफ्रिका संघाचा फुटबॉलपटू ताबिसो मोनयाने, कामोहेलो माहलात्सी आणि आंकर मॅश यांची करोना चाचणीही पॉझिटिव्ह आली आहे. संघाचे दोन खेळाडू व एक अधिकारी बाधित झाल्याची माहिती दक्षिण आफ्रिका फुटबॉल संघटनेने दिली आहे.