महाराष्ट्रासह केरळ, पंजाब, कर्नाटक, तामिळनाडूत करोना रुग्णसंख्येत वाढ

नवी दिल्ली, – देशाची एकूण सक्रिय रुग्ण संख्या आज 1 लाख 59 हजार 590 वर पोहोचली आहे. महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक, तामिळनाडू आणि गुजरात या सहा राज्यांमध्ये मागील 24 तासांत नवीन रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. महाराष्ट्रात दैनंदिन रुग्णसंख्येत सर्वाधिक 8,333 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ केरळमध्ये 3671 आणि पंजाबमध्ये 622 नवीन रुग्ण आढळले आहेत. गेल्या 24 तासांत 16,488 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. 

गेल्या दोन आठवड्यांत केरळमध्ये सक्रीय रुग्ण संख्येत सर्वाधिक घट निदर्शनाला आली आहे. 14 फेब्रुवारी रोजी असलेल्या 63,8477 रुग्ण संख्येवरून आज हा आकडा 51,679 इतका झाला आहे, तर याच काळात महाराष्ट्रात सक्रीय रुग्ण संख्येत सर्वाधिक वाढ झाली आहे, 14 फेब्रुवारी 34,449 रुग्ण संख्येत वाढ होऊन सध्या हा आकडा 68,810 वर पोहोचला आहे.

तेलंगणा, महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्यप्रदेश, गुजरात, पंजाब, जम्मू-काश्‍मीर आणि पश्‍चिम बंगाल या राज्यांमध्ये होत असलेल्या रुग्ण संख्येतील वाढीच्या पार्श्वभूमीवर कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली आज उच्चस्तरीय आढावा बैठक झाली.

देशात आतापर्यंत एकूण 1,42,42,547 लसींचे डोस देण्यात आले आहेत. अरुणाचल प्रदेश, तामिळनाडू, दिल्ली, तेलंगणा, लडाख, चंदीगड, नागालॅंड, पंजाब आणि पुडुचेरी 9 राज्यांनी नोंदणी झालेल्या आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांपैकी 60 टक्‍क्‍यांपेक्षा कमी जणांना लसीचा पहिला डोस दिला आहे.

लडाख, उत्तराखंड, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, ओदिशा, त्रिपुरा, मध्यप्रदेश, गुजरात, लक्षद्वीप, राजस्थान, केरळ आणि दादरा आणि नगर हवेली या 12 राज्यांनी आघाडीवर काम करणाऱ्या एकूण कामगारांपैकी 65 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त कामगारांचे लसीकरण केले आहे. पुद्दुचेरी, अंदमान आणि निकोबार बेटे, मेघालय, आसाम, तामिळनाडू, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, तेलंगणा, पंजाब, नागालॅंड, गोवा आणि मिझोरम या 12 राज्यांनी आघाडीवर काम करणाऱ्या एकूण कामगारांपैकी 40 टक्‍क्‍यांपेक्षा कमी जणांचे लसीकरण केले आहे.

देशात आतापर्यंत एकूण 1.07 कोटी लोक बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत 12,771 रूग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. देशाचा रुग्ण बरे होण्याचा 97.17 टक्के दर हा जगातील सर्वाधिक रुग्ण बरे होणाऱ्या देशांपैकी एक आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक 4,936 नवीन रुग्ण एकाच दिवशी बरे झाले आहे. गेल्या 24 तासांत केरळमध्ये 4,142 आणि त्यानंतर कर्नाटकमध्ये 642 रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत 113 मृत्यूची नोंद झाली आहे. यापैकी महाराष्ट्रात सर्वाधिक 48 मृत्यू झाले आहेत. तर पंजाबमध्ये 15 आणि केरळमध्ये 14 मृत्यूची नोंद झाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.