‘आंतरजातीय विवाह प्रोत्साहन रक्कम व विद्यार्थी शिष्यवृत्तीत वाढ करणार’

नवी दिल्ली:केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाचे राज्यमंत्री पदभार स्वीकारल्यानंतर आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मंत्रालयाच्या वतीने देशभर राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती दिली.

मंत्रालयाच्या वतीने आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी अडीच लाख रूपये प्रोत्साहन रक्कम देण्यात येते. आगामी काळात ही रक्कम वाढविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सध्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना माध्यमिक पूर्व व माध्यमिकोत्तर शिष्यवृत्ती 290 ते1200  रूपयांपर्यंत देण्यात येते, या शिष्यवृत्तीत वाढ करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या 10 वर्षांपासून  शिष्यवृत्तीची ही रक्कम कायम असून त्यात वाढ करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले .

अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना परदेशात शिक्षण घेण्यासाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या कोट्यात वाढ करण्यात येईल, तसेच मंत्रालयाअंतर्गत कार्यरत डॉ. आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने अनुसूचित जातीतील जनतेला शस्त्रक्रियेसाठी देण्यात येणाऱ्या साडेतीन लाखांच्या रकमेत वाढ करण्यात येणार असल्याचेही श्री. आठवले यांनी यावेळी सांगितले. अनुसूचित जातीच्या कल्याणासाठी मंत्रालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्या निधीमध्ये 55 हजार कोटींहून वाढ होऊन 76 हजार कोटी रूपये झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

देशातील 90  टक्के जनतेचे प्रतिनिधीत्व करणारे सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय येत्या काळातही सक्षमपणे कार्य करेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.