बॅंकांकडून ‘एनबीएफसीं’ना भांडवल पुरवठ्यात वाढ

विविध क्षेत्रांना कर्ज पुरवठा वाढण्यास होणार मदत

पुणे – केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंकेने सूचना केल्याप्रमाणे व्यावसायिक बॅंका बिगर बॅंकिंग वित्तीय संस्था म्हणजे “एनबीएफसीं’ना अधिक मदत करू लागल्या आहेत. त्यामुळे “एनबीएफसीं’कडून होणाऱ्या कर्ज वितरणात वाढ होऊन मंदी कमी होण्यास मदत मिळणार असल्याचे सांगण्यात आले.

सप्टेंबर 2018 पासून बॅंकांनी “एनबीएफसीं’ना कर्ज आणि इतर माध्यमातून 2.56 लाख कोटी रुपये उपलब्ध केले आहेत. अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या घडामोडींकडे रिझर्व्ह बॅंकेचे आणि अर्थ मंत्रालयाचे लक्ष आहे. त्यामुळे आगामी काळातही “एनबीएफसीं’ना पुरेसा भांडवल पुरवठा होईल, याची काळजी घेण्यात येत आहे.

विकास दर मोठ्या प्रमाणात कमी झाल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बिगर बॅंकिंग वित्तीय कंपन्यांची भांडवल सुलभता वाढविण्यासाठी काही उपाययोजना केल्या होत्या. त्याचाच भाग म्हणून बॅंकांना सशक्‍त “एनबीएफसीं’ना मदत करण्याच्या सूचना केल्या होत्या. याकरिता केंद्र सरकारने काही प्रमाणात हमीही उपलब्ध केली होती.

अर्थमंत्रालयाने जाहीर केलेल्या विविध उपाययोजनांची अंमलबजावणी ठीक होते की नाही याची काळजी घेण्यात येत आहे. छोट्या उद्योगांना कर्जपुरवठा वाढण्याबरोबरच त्यांचा कर परतावा वेळेवर परत मिळेल यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी निधी उपलब्ध करण्यात येत आहे. बॅंकांना भांडवली मदत करण्यात आली आहे. त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसून येऊ लागले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.