मुद्रा योजनेतील एनपीएत वाढ

रिझर्व्ह बॅंकेने दाखविला व्यावसायिक बॅंकांना लाल कंदील

पुणे – छोट्या आणि मध्यम उद्योगांना खेळते भांडवल उपलब्ध व्हावे याकरिता केंद्र सरकारने मुद्रा योजना सुरू केली. या माध्यमातून बराच भांडवल पुरवठा झाला असला तरी या कर्जाची परतफेड अपेक्षेइतकी होत नसल्याचे दिसून येत आहे. याबाबत बॅंकांनी वेळीच सावध होण्याची गरज असल्याचे रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे.

या खात्यामधून होत असलेल्या वसुलीकडे बारकाईने लक्ष देण्याची गरज असल्याचे रिझर्व्ह बॅंकेचे डेप्युटी गव्हर्नर एम. के. जैन यांनी बॅंकर्सना सांगितले आहे. छोट्या उद्योगातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होतो. त्याचबरोबर या उद्योगांचा राष्ट्रीय उत्पन्न आणि निर्यातीमधील वाटा जास्त असूनही पुरेसे भांडवल कमी व्याजदरावर उपलब्ध होत नाही.

ही बाब लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 मध्ये ही योजना सुरू केली व बॅंकांना छोट्या उद्योजकांना कर्जपुरवठा करण्याच्या सूचना दिल्या. योजना यशस्वी झाली असून बराच भांडवल पुरवठा झाला आहे. मात्र, सर्वसमावेशक आढावा घेतला असता यातील बरेच कर्ज परत येण्यात अडचणी निर्माण होत आहेत. याकडे बॅंकांनी दुर्लक्ष करू नये. या योजनेमुळे उद्योजकांना लाभ झाला आहे. रोजगार निर्मिती होऊन गरिबी कमी होण्यास मदत मिळाली आहे. मात्र, या योजनेसंदर्भातील अनुत्पादक मालमत्ता चिंता वाटेल एवढ्या पातळीवर वाढली आहे. त्यामुळे बॅंकांनी या योजनेअंतर्गत नवे कर्ज देताना कर्ज परतफेडीची क्षमता आहे का नाही याची काळजी घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. दिलेले भांडवल संबंधित कामासाठी योग्य प्रकारे वापरले जात आहे का, यावर निगराणी ठेवण्याचीही गरज आहे.

गेल्या 10 वर्षांपासून वाढलेल्या अनुत्पादक मालमत्तेमुळे बहुतांश बॅंका त्रस्त आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या बॅंकांना त्यामुळे बराच तोटा झाला आहे. आता इतर क्षेत्रांतून अनुत्पादक मालमत्ता निर्माण होऊ नये याकरिता बॅंकांनी दक्ष राहण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)