पुणे(प्रतिनिधी) – इंधनाचे दरात झालेली वाढ, पशुखाद्याचे वाढलेले दर यामुळे दूध उत्पादक शेतकरी अत्यंत अडचणीत आला आहे. याबरोबरच दुध उत्पादनात झालेली घट या परिस्थितीत दूध उत्पादक शेतकऱ्यास मदत करण्याच्या हेतुने पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने दि. 11 फेब्रुवारी 2021 पासून गायीच्या दुधाच्या (3.5 फॅट व 8.5 एसएनएफ साठी) खरेदी दरात प्रति लि.1 रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. संघाने यापूर्वी दि. 21 जानेवारी 2021 पासून गायीच्या दुधाच्या खरेदी दरात प्रति लि. रु. 1/- दरवाढ दिलेली आहे.
येत्या 11 फेब्रुवारी 2021 पासून गाय दूधाचा (3.5 फॅट व 8.5 एसएनएफ साठी) खरेदी दर प्रति लि. वरकड खर्चासह संस्थांसाठी रु. 28.70 राहिल. याबाबत पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे संचालकांबरोबर चर्चा करून हा निर्णय घेतला असून येणाऱ्या संचालक मंडळाच्या सभेत या निर्णयावर कार्योत्तर मंजूरी घेण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील दूध उत्पादक व सर्व दूध संस्थांनी संघास स्वच्छ, ताज्या व भेसळ रहित उच्चतम गुणप्रतीच्या दूधाचा जास्तीत-जास्त पुरवठा करावा असे आवाहन संघातर्फे करणेत येत असल्याची माहिती चेअरमन विष्णू हिंगे यांनी दिली.