पुणे – इंधन दरवाढ, पशुखाद्याचे वाढलेले दर यामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. याबरोबरच दूध उत्पादनही घटले आहे. यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यास मदत करण्यासाठी पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने दुधाच्या खरेदी दरात प्रतिलिटर 1 रुपयाने वाढ केली आहे. याबाबत पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे संचालकांबरोबर चर्चा करून हा निर्णय घेतला असून येणाऱ्या संचालक मंडळाच्या सभेत या निर्णयावर कार्योत्तर मंजुरी घेण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील दूध उत्पादक व सर्व दूध संस्थांनी संघास स्वच्छ, ताज्या व भेसळरहित उच्चतम गुणप्रतीच्या दुधाचा जास्तीत-जास्त पुरवठा करावा, असे आवाहन संघातर्फे केल्याची माहिती चेअरमन विष्णू हिंगे यांनी दिली.
असा आहे निर्णय
दि. 11 फेब्रुवारीपासून गायीच्या दूध (3.5 फॅट व 8.5 एसएनएफसाठी) खरेदी दरात प्रति लि.1 रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. संघाने यापूर्वी दि. 21 जानेवारीपासून गाय दूधासाठी प्रति लि. रु. 1/- दरवाढ दिलेली आहे. खरेदी दर प्रति लि. वरकड खर्चासह संस्थांसाठी रु. 28.70 राहिल.