नवी दिल्ली – चौथ्या तिमाहीत महाराष्ट्र बॅंकेच्या कर्ज आणि ठेवीत भरघोस वाढ झाल्यामुळे हे एकूण व्यवसाय वाढला असल्याचे बॅंकेने म्हटले आहे. या तिमाहीत बॅंकेचा कर्जपुरवठा तब्बल 29.59 टक्क्यांनी वाढून 1.75 लाख कोटी रुपयांवर गेला आहे.
महाराष्ट्र बॅंकेने शेअर बाजाराला कळविलेल्या माहितीत म्हटले आहे की, मार्चअखेर संपलेल्या तिमाहित बॅंकेचा एकूण व्यवसाय 21.28 टक्क्यांनी वाढून चार लाख कोटी रुपयांवर गेला आहे.
गेल्या वर्षी या कालावधीत ही रक्कम 3.37 लाख कोटी रुपये इतकी होती. मार्च अखेर बॅंकेतील ठेवी 15.7% नी वाढून 2.34 लाख कोटी रुपये झाल्या आहेत. गेल्या वर्षी या कालावधीत ठेवीची रक्कम 2.02 लाख कोटी रुपये होती.
या तिमाहीत बॅंकेच्या करंट आणि सेव्हिंग अकाउंट मधील रक्कम एकूण ठेवीच्या 53.59% इतकी आहे. आता बॅंकेचे कर्ज व ठेवीचे प्रमाण 74.87% झाले आहे. गेल्या वर्षी हे प्रमाण 66.85% होते. मार्च अखेर बॅंकेची ढोबळ गुंतवणूक 69,215 कोटी रुपये आहे.