परवाना व साठा शुल्कात होणार वाढ

महापालिकेकडून शुल्क दुप्पट करण्याचा प्रस्ताव

पुणे – महापालिका अधिनियम कलम 313 व 376 नुसार शहरातील काही ठराविक व्यावसायिकांना मशीनरी परमीट व साठा परवाना दिला जातो. त्यासाठी महापालिकेकडून आकारण्यात आलेल्या शुल्कामध्ये दुप्पट वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी स्थायी समितीत प्रस्ताव ठेवण्यात आला असून आचारसंहितेमुळे हा प्रस्ताव पुढे ढकलण्यात आला आहे. या परवाना आणि परमीट शुल्कात महापालिकेने 2008-09 मध्ये वाढ केली होती. या परमीट शुल्कातून महापालिकेस 2017-18 मध्ये सुमारे 57 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

महापालिकेच्या हद्दीत वाफ, पाणी, विद्युतशक्ती किंवा अन्य यांत्रिक शक्ती यांचा उपयोग करून कारखाना, कर्मशाळा आदी व्यवसाय/उद्योगधंद्यास तसेच रासायनिक, ज्वलनशील अशा पदार्थांचा साठा करण्यास परवानगी दिली जाते. त्यासाठी महापालिकेकडून 2008-09 मध्ये शुल्क निश्‍चित केले होते, त्यानंतर 2010 मध्ये ठराव करून 2012 पर्यंत या शुल्कात 20 टक्‍के वाढ करण्यास मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर मात्र, या शुल्कात अद्याप कोणतीही वाढ झालेली नाही. हीबाब लक्षात घेऊन प्रशासनाने घटलेल्या उत्पनाच्या पार्श्‍वभूमिवर या शुल्कात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दरवाढीने पालिकेच्या उत्पन्नात सुमारे 50 ते 60 लाखांची वाढ होणार आहे. दरम्यान, पुढील महिन्यात 3 मे रोजी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत आचारसंहिता शिथील झाल्यानंतर त्यास मान्यता मिळण्याची शक्‍यता आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.