नवी दिल्ली – एकूणच व्याजदरात वाढ होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने अल्पबचतीवरील व्याजदरात काही प्रमाणात वाढ केली आहे.
शुक्रवारी सरकारने जारी केलेल्या माहितीनुसार नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, पोस्ट ऑफिस मधील टर्म डिपॉझिट आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या बचत योजना वरील व्याजदर 1.1% पर्यंत वाढविण्यात आले आहेत.
या नव्या व्याजदराची अंमलबजावणी एक जानेवारीपासून होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र पब्लिक प्रॉव्हिडंट फंड आणि सुकन्या समृद्धी योजनेतील व्याजदरात कसलाही बदल केलेला नाही. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटवर यापूर्वी 6.8% व्याजदर होता. तो आता सात टक्के करण्यात आला आहे.
ज्येष्ठ नागरिकांच्या बचतीवर या अगोदर 7.6% व्याजदर होता तो आता आठ टक्के करण्यात आला आहे. पोस्टात ठेवलेल्या टर्म डिपॉझिटवर व्याजदरात 1.1% पर्यंत वाढ करण्यात आली आहे. मासिक उत्पन्न योजनेवर अगोदर 6.7% व्याज होते ते आता 7.1% करण्यात आले आहे.