नवी दिल्ली – मे महिन्यामध्ये औद्योगिक उत्पादन 29.3 टक्क्यांनी वाढले असल्याची आकडेवारी केंद्रीय सांख्यिकी विभागाने जाहीर केली आहे. गेल्या वर्षी मे महिन्यामध्य लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यामुळे औद्योगिक उत्पादन उणे 33.4 टक्के इतके नोंदले गेले होते.
त्या तुलनेत मे 2021 महिन्यामध्ये औद्योगिक उत्पादन 29.3 टक्के इतके नोंदले गेले आहे. याचा अर्थ खऱ्या अर्थाने औद्योगिक उत्पादनात फारशी वाढ झालेली नाही. फक्त तुलनात्मक पातळीवर औद्योगिक उत्पादन वाढले असल्याचे दिसून येते. मे महिन्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची उत्पादकता 34.5 टक्क्यांनी वाढली आहे. खाण क्षेत्राची उत्पादकता उत्पादकता 23.3 टक्यांनी तर वीज उत्पादन 7.5 टक्क्यांनी वाढले आहे.
मात्र त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे या वर्षाच्या मे महिन्यातील उत्पादनावर गेल्या वर्षाच्या मे महिन्यातील उत्पादनापेक्षा कमी परिणाम झाला आहे. मे महिन्यामध्ये बऱ्याच राज्यांमध्ये निर्बंध लागू करण्यात आले असले तरी त्याचा गेल्या वर्षाइतका परिणाम झालेला नाही.
जून महिन्यानंतर निर्बंध कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे आगामी काळामध्ये औद्योगिक उत्पादन वेगाने वाढण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे विश्लेषकांना वाटते. या वर्षी भारताचा विकासदर साधारणपणे दहा टक्के इतका राहण्याची शक्यता सध्याच्या परिस्थितीमध्ये गृहीत धरण्यात येत आहे. या अगोदर ही दर दहा टक्क्यांपेक्षा जास्त होईल असे समजले जात होते. मात्र दरम्यानच्या काळामध्ये बऱ्याच राज्यांमध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे निर्बंध जारी करण्यात आल्यामुळे या उत्पादकतेवर परिणाम झालेला आहे.