भारताच्या पेटंट सादरीकरणात वाढ

नवी दिल्ली – भारतात संशोधन आणि विकासासाठी पूरक वातावरण तयार होऊ लागले आहे. 2015 ते 2018 या कालावधीत भारतात कार्यरत असलेल्या कंपन्यांनी अमेरिकेत 4600 पेटंटसाठी प्रस्ताव दाखल केलेले आहेत.
विशेष म्हणजे हे सर्व पेटंट तंत्रज्ञान क्षेत्रातील आहेत. ही माहिती शुक्रवारी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांची शिखर संस्था असलेल्या नॅस्कामने जारी केली आहे.

भारतात मोठ्या प्रमाणात बौद्धिक मालमत्ता तयार होऊ लागली आहे. भारतातील कंपन्या संशोधन विकासात मोठे योगदान करीत आहेत. त्याचबरोबर जागतिक कंपन्यांची संशोधन आणि विकास केंद्रे भारतामध्ये कार्यरत आहेत. कारण भारतात अभियांत्रिकी आणि इतर क्षेत्रात कुशल मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. विशेष म्हणजे भारतातील स्टार्टअपने 200 पेटंटसाठी या काळात अर्ज दाखल केले आहेत. त्यातील बरेच पेटंट नव्याने विकसित होत असलेले तंत्रज्ञान म्हणजे कृत्रिम बौद्धिक मालमत्ता, सायबर सुरक्षा, वाहन तंत्रज्ञान, इंटरनेट ऑफ थिंग्स या क्षेत्रातील आहे.

2015 मध्ये एकूण पेटंटमध्ये तंत्रज्ञान क्षेत्रातील क्षेत्राचा वाटा 51 टक्‍के होता. तो आता 64.5 टक्‍क्‍यांवर गेला आहे. त्यातल्या त्यात नव्याने विकसित होणाऱ्या क्षेत्रातील तंत्रज्ञानावर आधारित पेटंटची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. त्यात दूरसंचार तंत्रज्ञान आणि संगणक तंत्रज्ञान इत्यादीचा समावेश आहे. जगभरात या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संशोधन होत आहे. भारतही या क्षेत्रात आघाडीवर असल्याचे दिसून येते, असे या संस्थेने म्हटले आहे.

“केंद्र सरकार आणि कंपन्यांनी संशोधन आणि विकासात मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले आहेत. त्यामुळे नावीन्याच्या क्षेत्रात भारत आगेकूच करत आहे. त्यामुळे भारतातून दाखल होणाऱ्या पेटंटच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. आगामी काळात भारत औद्योगिकदृष्ट्या विकसित होणार असल्याची ही लक्षणे आहेत.
-देबजनी घोष, अध्यक्ष नॅसकॉम

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.