सायबर सेलकडे दाखल होतात अनेक तक्रारी : प्रकार रोखण्याचे सेल समोर आव्हान
पुणे – फेसबुक, व्हॉटस्अप, ट्विटर आदी सोशल मीडियाच्या माध्यमांतून संवादाचे प्रमाण वाढत आहे. अनेकजण या अभासी जगातील मित्र-मैत्रिणींमध्ये रममाण झालेले दिसून येतात. मात्र, सोशल मीडियाच्या या मोह जाळामध्ये अडकल्याने युवक-युवतींसह नागरिकांच्या फसवणुकीचे प्रकारही वाढत आहेत. फेसबुक मैत्रीतून अनेक युवतींना बदनामीची झळ सोसावी लागली आहे. तसेच युवतींच्या सौंदर्याच्या मोहजालात अडकून अनेकांची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे सायबर सेलकडे आलेल्या तक्रारींतून उघडकीस आले आहे.
परदेशी युवतींच्या नावे फेसबुक खाते तयार करून पुणे शहरातील व्यावसायिक, युवकांसोबत मैत्री करून गुंतवणूक तसेच वाढदिवसानिमित्त भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने फसवणूक केल्याचे प्रकारही उघडकीस आले आहेत. विवाहविषयक संकेतस्थळावर ज्या युवतींनी लग्नासाठी प्रोफाईल तयार केले आहे. अशा युवती तसेच महिलांची माहिती आरोपी फेसबुकवरून काढतात आणि त्यांना रेंड रिक्वेस्ट पाठवून मैत्री करतात. त्यानंतर स्वत: डॉक्टर, इंजिनिअर असल्याची बतावणी करीत मला अमेरिकेत अथवा इंग्लंडमध्ये मोठ्या पगारावर नोकरी असल्याचे सांगून विश्वास संपादित करतात.
त्यानंतर हिरेजडीत सोन्याचे दागिने अथवा रोख रक्कम भेट स्वरूपात पाठविली असल्याचे सांगून विमानतळावर कस्टम विभागाकडून सदर बॅग सोडवून घेण्यासाठी बॅंक खात्यावर लाखो रुपयांची रक्कम भरावयास लावून त्यांची फसवणूक केली जात जात आहे. याप्रकारच्या गुन्ह्याचा ट्रेंड वाढत आहे. यामध्ये अनेक उच्च शिक्षित युवतींची फसवणूक करण्यात आली असल्याचे उघडकीस आले आहे.
स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे कार्यान्वित
सायबर क्राईम संदर्भातील तक्रारींमध्ये वाढ होत आहे. गतवर्षीमध्ये तब्बल हजार तक्रारी आल्या आहेत. हा आकडा लक्षात घेता गुन्ह्याच्या तपासासाठी शिवाजीनगर मुख्यालय येथे स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे कार्यान्वित करण्यात आले आहे. सायबर पोलीस ठाण्यात अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.