पिंपरी, दि. 5 – पिंपरीतील वायसीएमएच (यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालय) मधील रुग्ण रांगेच्या चक्रव्युहात अडकला आहे. या रांगेतून सुटका करण्यासाठी औषध वाटपाच्या दोन खिडक्या वाढविण्यात आल्या आहेत. गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाकडून ही उपापयोजना करण्यात येत आहे.
वायसीएम रुग्णालयात तपासणीसाठी गेलेल्या रुग्णाला प्रथम हेल्थ कार्ड पंचिंग करण्यासाठी रांग लावावी लागते. त्यानंतर डॉक्टरकडे तपासणीसाठी रांग, डॉक्टरांनी दिलेल्या तपासणीपैकी रक्त, एक्स-रे किंवा सोनोग्राफी करायची असल्यास प्रथम पैसे भरण्यासाठी रांग आणि त्यानंतर प्रत्यक्ष तपासणीसाठी रांग लावावी लागते. त्यानंतर औषध घेण्यासाठी आलेल्या रुग्णास प्रथम औषधासाठी पैसे भरावे लागतात आणि त्यानंतर औषध मिळते. मात्र या दोन्हीसाठीही रांग लावावी लागते. त्यातही माजी नगरसेवक, महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी, अपंग आणि पत्रकार यांना औषधे देताना प्राधान्य द्यावे लागते. यामुळे अनेकदा वादाचे प्रसंग घडतात. हे वादाचे प्रसंग टाळण्यासाठी महापालिकेच्या औषध विभागाने आणखी दोन खिडक्या नव्याने सुरू केल्या आहेत. या दोन खिडक्यांमधून माजी नगरसेवक, महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी, अपंग आणि पत्रकार यांना औषधे दिली जातात. प्रशासनाच्या या निर्णयामुळे सर्वसामन्य रुग्णांना दिला मिळाला असून त्यांना लवकर औषधे मिळत आहेत.
गेल्या 15 दिवसांपूर्वी या औषधाच्या खिडक्या सुरू केल्या असल्या तरी यासाठी दोन संगणक आणि विद्युत विषयक कामे करणे गरजचे आहे. ही कामे झाल्यावर या नवीन खिडक्यांमधून पूर्ण क्षमतेने काम करता येणार आहे.