नवी दिल्ली : बलात्कार प्रकरणात तुरुंगात सध्या असलेल्या मुरुग मठाचे प्रमुख शिवमूर्ती मुरुग शरनारू यांच्या अडचणीत आता पुन्हा एकदा वाढ झाली असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी बाबाच्या विरोधात तब्बल 694 पानी आरोपपत्र तयार केले आहे. दरम्यान, या आरोपपत्रात झालेले खुलासे थक्क करणारे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवमूर्ती मुरुग शरनारू यांच्या आश्रमामध्ये पूर्णपणे संशय निर्माण करणारी परिस्थिती पाहायला मिळाली. कारण त्याच्या बेडरूममध्ये ड्रग्ज, दारू आणि अंमली पदार्थांचा पुरवठा केला जात असल्याचा दावा पोलिसांनी केला. एवढेच नाही तर रात्रीच्या वेळी अल्पवयीन मुलींना बेडरूममध्ये पाठवण्यात येत होते. दरम्यान, अशाच पीडित दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याप्रकरणी मठाच्या प्रमुखाला अटक करण्यात आली होती.
ओडनादी एनजीओचे संचालक स्टेनली यांच्या म्हणण्यानुसार, मठाद्वारे चालवल्या जाणाऱ्या अक्का महादेवी वसतिगृहाची वॉर्डन रश्मी रात्री अल्पवयीन विद्यार्थिनींना बाबांच्या खोलीत पाठवत असे, यानंतर मुलींनी विरोध केल्यावर बाबांनी त्यांना सफरचंद आणि मादक पदार्थांनी भरलेली चॉकलेट्स खायला दिली, त्यानंतर या मुली बेशुद्ध पडल्या. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. एसपी म्हणाले की, स्वत:ला देवाचे अवतार म्हणवून घेणारे संत विद्यार्थिनींना सेवा करण्यास नकार दिल्याने त्यांना शिव्याशाप देण्याची धमकी देत असत. त्याने त्यांना सांगितले की त्याचा शाप त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा नाश करेल.
एनजीओचे संचालक स्टॅनले यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपपत्रात कर्नाटक-आंध्र प्रदेश सीमेवरील रेल्वे ट्रॅकवर एका मुलीचा गूढ परिस्थितीत मृत्यू झाल्याचाही उल्लेख आहे. घटनेच्या काही दिवस आधी वसतिगृहातील मुलीला मठातून दूर पाठवले होते. मुलीचे वडील अंध असल्याने ती वसतिगृहात राहायची. जर मठ मुलीची काळजी घेऊ शकत नसेल तर तिला बाहेर पाठवले जाऊ शकत नाही. प्रक्रियेचे पालन न करता त्याला घरी पाठवण्यात आले त्यामुळे या गोष्टीचा तपास करण्यात यावा अशी मागणी देखील करण्यात येत आहे.