पुणे – परदेशात वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण घेऊन मायदेशी परतलेल्या विद्यार्थ्यांना निकालानंतरही डाॅक्टरासाठी आवश्यक असलेल्या नोंदणी क्रमांकासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे पदव्युत्तर शिक्षण घेऊ पाहणाऱ्या किंवा प्रॅक्टिस करण्याचे नियोजन असलेल्या डॉक्टरांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. अद्यापही ही नोंदणी प्रक्रिया सुरू न झाल्याने उमेदवार प्रतीक्षेत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
या नोंदणी प्रक्रियेनंतर संबंधित डॉक्टर स्थानिकांना सेवा देऊ शकतात. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने चार महिन्यांपासून अशा उमेदवारांना नोंदणी क्रमांक दिलेला नाही. त्यामुळे यामधील काही उमेदवार जे पदव्युत्तर परीक्षा पास झालेले आहेत; परंतु त्यांना पुढील अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा आहे, तसेच काही मुलांना नोकरी व वैद्यकीय सेवा द्यायची आहे, अशा मुलांना कायमचा नोंदणी क्रमांक न मिळाल्यामुळे अडचणी येत आहेत.
नोंदणी क्रमांकामुळे संबंधित डॉक्टरांना भारतात इंटर्नशिप करता येते. ती पूर्ण झाल्यानंतर या उमेदवारांना कायमचा नोंदणी क्रमांक मिळतो. त्यानंतर त्यांचा भारतातील पदव्युत्तर शिक्षणाचा, तसेच वैद्यकीय सेवेचा मार्ग सुकर होतो.
भारतातील अनेक विद्यार्थी दरवर्षी विविध देशांत वैद्यकीय पदवीचे शिक्षण घेण्यासाठी जातात. तेथून शिक्षण पूर्ण करून परतल्यानंतर भारतात थेट वैद्यकीय सेवा करण्यास मान्यता नाही.
त्यासाठी आधी पात्रता परीक्षा द्यावी लागते आणि तिची काठिण्य पातळी खूप अधिक आहे. त्यामुळे या परीक्षेचे निकाल सातत्याने कमी लागला आहे. यावर्षी ३४ हजार ६०८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. पैकी केवळ ७ हजार २३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या उत्तीर्ण डॉक्टरांमधील महाराष्ट्रातील आहेत. त्यांना अद्याप नोंदणी क्रमांक न मिळाल्याने त्यांचा पुढील वैद्यकीय प्रवास थांबला आहे. यामुळे ही नोंदणी प्रक्रिया सुरू करण्याची मागणी विद्यार्थी व पालकांतून होत आहे.