नवी दिल्ली – सार्वजनिक इंधन कंपन्यांनी शुक्रवारी डिझेलच्या दरात लिटरमागे 20 पैशांची वाढ केली. त्यामुळे ते इंधन दोन महिन्यांच्या खंडानंतर महागले. दरम्यान, पेट्रोल दर जैसे थे ठेवण्यात आला.
सार्वजनिक कंपन्या इंधन दरांचा आढावा घेऊन दररोज ते बदलतात किंवा कायम ठेवतात. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या इंधनांचे दर वाढूनही कंपन्यांनी 5 सप्टेंबरपासून दरांमध्ये कुठला बदल केला नव्हता.
आता आंतरराष्ट्रीय दर उच्चांकी पातळीवर येऊन ठेपले असतानाच कंपन्यांनी डिझेलच्या दरात वाढ केली आहे. त्यामुळे पुढील काळात इंधने आणखी महागण्याचे संकेत मिळत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या इंधनांचे दर सध्या प्रतिपिंप 77.50 डॉलर्सवर पोहचले आहेत.
भारताच्या निम्म्याहून अधिक भागात पेट्रोलच्या दराने याआधीच शंभरी ओलांडली आहे. तर, देशाच्या तीन राज्यांत डिझेलचा दरही शंभर रूपयांवर पोहचला आहे. भारताला लागणाऱ्या एकूण इंधनांपैकी 85 टक्के वाटा आयातीचा आहे. त्यामुळे देशातील दर आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून आहेत.