आतापर्यंत 1,017 नागरिकांचा मृत्यू
वुहान : चीनमध्ये कोरोना विषाणूमुळे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना पहायला मिळत आहे. चीन सरकार बरेच प्रयत्न करत आहे तरी सुध्दा मृतांचा आकडा वाढतच आहे. बुधवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, चीनमध्ये कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 1,017 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर 42,708 नागरिकांना या विषाणूची लागण झाली आहे.
आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारपर्यंत कोरोनाची लागण झालेल्या 1,017 रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर चीनमध्ये आतापर्यंत 42,708 नागरिकांना या विषाणूची लागण झाली आहे. तसेच, जगभरामध्ये 390 नागरिकांना या विषाणूची लागण झाल्याची प्रकरणे समोर आली आहेत.
चीनमध्ये कोरोना विषाणू हळूहळू रौद्ररुप धारण करत आहे. या विषाणूमुळे चीनमध्ये मृतांचा आकडा वाढत चालला आहे. तर जगभारातील 20 देशांमध्ये हा विषाणू पोहचला आहे. त्याठिकाणी देखील कोरोनाची लागण झालेले रुग्ण आढळले आहे. कोरोना विषाणूमुळे जगभरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेचे विशेष पथक सोमवारी रात्री चीनमध्ये दाखल झाले. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या पथकाने चीनी आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेत अनेक मुद्द्यांवर चर्चा केली.