पुणेकरांना आरोग्याचा धोका उद्भविण्याची शक्यता
पातळी “असमाधानकारक’ स्तरापर्यंत खालावली
पुणे – शहरातील हवेच्या प्रदूषणात वाढ झाली असून, हवेची पातळी “असमाधानकारक’ स्तरापर्यंत खालावली आहे. त्यामुळे पुणेकरांना आरोग्याचा धोका उद्भविण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शहराचे वातावरण थंड होत असून, त्यामुळे हवा जड होत आहे. परिणामी हवेतील प्रदूषके आहे त्याच स्थितीत रहात असल्याने हवेतील प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळेच शहराची हवा प्रदूषित होत असून, त्याचा परिणाम थेट नागरिकांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता आहे. “सफर’ या केंद्रीय संस्थेच्या पाहणीनुसार, “शहराच्या हवेत पीम 10 या प्रदूषकाचे सध्याचे प्रमाण 165 क्युबिक घनमीटर इतके असून, आगामी काही दिवसांत ते 196 क्युबिक घनमीटरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. पीएम 2.5 या प्रदूषकाचे प्रमाण 102 क्युबिक घनमीटर असून, पुढील काही दिवसांत ते 119 क्युबिक घनमीटरपर्यंत वाढेल, अशी शक्यता वर्तविली आहे.
प्रदूषण मानकानुसार हे प्रमाण 100 क्युबिक घनमीटरपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. मात्र, हवेतील प्रदूषकांचे प्रमाण वाढल्यामुळे शहरातील हवा हानिकारक पातळीवर प्रदूषित होत आहे.
प्रदूषित हवेत जास्तकाळ राहिल्याने मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून, प्रामुख्याने त्वचेचे आजार, श्वसनाचे विकास असे विविध आजार उद्भवतात. त्यामुळे हवेचे प्रदूषण हे मानवी आरोग्यासाठी अतिशय हानीकरक असून, ते रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येते.