पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील जैववैद्यकीय कचऱ्यात 700 किलोंनी वाढ झाली असून प्रमुख्याने रुग्णालय आणि विलगीकरण केंद्र असलेल्या परिसरातून हा कचरा निर्माण होण्याचे प्रमाण जास्त आहे.
लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग, व्यवसाय ठप्प पडले आहेत. विशेषतः हॉटेल्स, खाद्यपदार्थ यांची दुकाने बंद आहेत. त्यामुळे घनकचरा मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. मात्र, जैववैद्यकीय कचरा निर्मितीत वाढ झाली आहे. शहरातील विविध रुग्णालयांमध्ये करोनाबाधित रुग्णांचे प्रमाण वाढले असल्याने याठिकाणी वैद्यकीय संसाधनांचा वापरदेखील वाढला आहे. तसेच, विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्तींबाबतही विशेष काळजी घेतली जात असल्याने त्याठिकाणी वापरले जाणाऱ्या वैद्यकीय वस्तूंचे प्रमाणदेखील लक्षणीय आहे. यामध्ये प्रामुख्याने इंजेक्शन, सलाईन बॉटल, मास्क, कपडे अशा विविध वस्तूंचा समावेश आहे. शहरातील जैववैद्यकीय कचरा 500 ते 700 किलोनी वाढल्याची नोंद महापालिकेच्या घनकचरा विभागाकडून करण्यात आली आहे.
पालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून हा कचरा दर रोज गोळा केला जात असून, घनकचरा व्यवस्थापन कायद्यातील जैववैद्यकीत कचराबाबतच्या नियमानुसार त्याची विल्हेवाट लावण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या नवीन नियमानुसार करोना रोगसंबंधीत असलेला कचरा हा पिवळ्या पिशवीत जमा करणे अनिवार्य आहे, ज्यामुळे हा कचरा हाताळताणा अधिक सावधता बाळगणे शक्य होईल. तशा सूचना रुग्णालयांना देण्यात आल्याचेही विभागातर्फे संगण्यात आले.