वाहनांच्या धुरामुळे हवा प्रदूषणात वाढ

 मंचर परिसरातील नागरिक, वाहनचालक त्रस्त

अवसरी- मंचर (ता. आंबेगाव) परिसरामध्ये वाढत्या वाहनांच्या धुरामुळे सध्या मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषणात वाढ होत आहे. या परिसरात धूर बाहेर टाकणारी वाहने रस्त्यावर पहावयास मिळत आहेत, अशा वाहनांवर प्रशासनाकडून त्वरित कारवाई करावी, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.

पुणे-नाशिक हा महामार्ग हा आंबेगाव तालुक्‍यातील पेठ-अवसरी फाटा-मंचर-कळंब-वर्पे मळा या भागातून जातो. या महामार्गावरून हजारो वाहने दररोज दळण-वळण करत असतात. यामध्ये प्रामुख्याने मालवाहू ट्रक, चार-चाकी, दुचाकी वाहने यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. माल वाहतुकीची वाहने आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेस, ट्रॅक्‍टर, दुचाकी या रस्त्यावरून जात असताना अतिशय काळाकुट्ट धूर सोडत असतात. त्यामुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत आहे. वाहनचालक, प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.प्रदूषण करणाऱ्या मोठ्या वाहनांच्या मागे चालणारी दुचाकी वाहने किंवा प्रवासी यांना या धुरामुळे डोळ्यांचे आजार होऊ लागले आहेत.

कोणत्याही रस्त्याला पहा समोर चालणारे डिझेल वाहन मोठ्या प्रमाणावर धूर सोडत असते. या वाढत्या प्रदूषणामुळे आजारांचाही धोका वाढला आहे. धुरातील कार्बन डायऑक्‍साइड घटकांमुळे डोळे, फुफ्फुसाचे आजार, दमा अशा प्रकारचे आजार जडत आहेत. वाहनांमुळे प्रदूषण होण्याची कारणे शोधून त्यावर प्रशासनाने उपाय योजना करण्याची गरज आहे. इंधनात भेसळ झालीतर इंधनाचे पूर्णपणे ज्वलन होत नाही आणि धुराचे प्रमाण वाढते. जर इंधनात लो डेन्सीटी ऑईल मिक्‍स केले तरी सुद्धा वाहन मोठ्याप्रमाणावर धूर टाकते. त्यासाठी वेळोवेळी पंपावरील इंधन तपासणी करणे गरजेचे आहे. कालबाह्य वाहने वापरात असल्याने सुद्धा प्रदूषण वाढत आहे.

  • प्रदूषण करणाऱ्या वाहनाचे काय?
    प्रदूषण होऊ नये म्हणून सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी प्रशासन विविध उपाय योजना राबवत आहे. त्यात झाडे लावा, झाडे जगवा अशा अनेक मोहिम राबविल्या जात आहेत. परंतु प्रदूषण करणाऱ्या वाहनाचे काय? असा संतप्त सवाल प्रवासी करीत आहेत.
  • प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी-
    महामार्ग वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना ज्या ठिकाणी अशी वाहनांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी प्रवासी, वाहन चालक करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.