महामार्गावर मोकळ्या बाटल्या, प्लॅस्टिक फेकल्याने अपघातांमध्ये वाढ

पुणे – अलिशान कार किंवा बसमध्ये बसून प्रवास करताना खूप छान वाटते. मात्र, आपला प्रवास सुखाचा होत असताना दुसऱ्यांचा प्रवास “अपघाताचा’ ठरू नये, यासाठी प्रवाशांनी पाण्याच्या मोकळ्या बाटल्या, खराब झालेले अन्नपदार्थ, चिप्स किंवा अन्य प्लॅस्टिक रस्त्यावर फेकू नये. कारण, महामार्गांवर पडलेली बाटली किंवा अन्नपदार्थांवरून दुचाकी स्लीप होवून अनेक अपघात झाले आहेत. प्रवाशांची एक चूक वाहनचालकाला मृत्युच्या दारापर्यंत पोहचवत आहे. त्यामुळे प्रवाशांनो स्वत:च्या निष्काळजीपणाचा फटका दुसऱ्या वाहनचालकांना बसून देऊ नका.

पुणे शहरातून सातारा, कोल्हापूर, मुंबई, सोलापूर, पंढरपूर, औरंगाबाद, शिर्डी, नाशिक हे प्रमुख महामार्ग जातात. या मार्गावर दुचाकीस्वारांपासून मोठ्या गाड्या दररोज हजारोंच्या संख्येने धावत असतात. शहरापासून जवळ असलेल्या एमआयडीसी, आयटी कंपन्या, ऑफीस आणि गाव याठिकाणी जाण्यासाठी बहुतांश नागरिक दुचाकीनेच प्रवास करताना दिसतात. त्यामुळे या मार्गावर दररोज अपघातांचे सत्र पहायला मिळते. त्यामध्ये वाहनचालकांच्या चुकीमुळे अनेक अपघात होत असून, प्रामुख्याने रस्त्यावर पडलेल्या बाटल्या, मृत अवस्थेत पडलेली जनावरे, खराब अन्नपदार्थ, प्लॅस्टिक कागद यावरून दुचाकी घसरून अपघात होण्याचे प्रमाण अधिक आहे. या अपघातांना बेशिस्त प्रवाशीच जबाबदार आहेत.

कार किंवा बसमधून प्रवाशाला बाहेर पडताना नागरिक पाण्याच्या बाटल्या, खाऊ किंवा जेवण घेतात. मात्र, अनेक प्रवाशी पाणी संपल्यानंतर बाटली गाडीत न ठेवता खिडकीतून बाहेर फेकून देतात, लहान मुले चिप्स, कुरकुरे यांचे प्लॅस्टिक कागद तर खराब झालेले अन्नपदार्थ रस्त्यावर फेकून द्यायलाही हे प्रवाशी मागेपुढे विचार करत नाहीत. परंतू, झाकण बंद असलेल्या बाटल्या वाऱ्यामुळे अचानक रस्त्यावर येत असल्यामुळे दुचाकीस्वार गडबडतो आणि अपघात होतो. या किरकोळ कारणावरून अनेक अपघात झाले आहेत. काहींना कायमचे अपंगत्व आणि जीव गमवावा लागला आहे.

महामार्गावर किंवा सार्वजनिक ठिकाणी घाण टाकणे, पाण्याच्या बाटल्या टाकण्याचे चुकीचे आहे. वाहनांची धडक लागून मृत्यू झालेली जनावरे, पाण्याच्या बाटल्या, खराब अन्नपदार्थ आणि प्लॅस्टिक पिशव्यांमुळे अनेक अपघात झाले आहेत. त्यामुळे प्रवाशांनी स्वत:ची जबाबदारी ओळखून महामार्गावर हा कचरा टाकू नये.
– मिलिंद मोहिते, पोलीस अधीक्षक, महामार्ग पुणे.

दुचाकींची घसरगुंडी वाढली; प्रशासन निद्रिस्त
खंबाटकी घाटात पाण्याने अर्धवट भरलेली बाटली दुचाकीच्या मध्ये आली आणि दुचाकी स्लीप झाली. नशिब चांगले म्हणून मागून कोणते वाहन नव्हते. त्यामुळे किरकोळ जखमेवर भागली, अशी प्रतिक्रिया वाहनचालकाने दिली. रात्रीच्यावेळी रस्त्यामध्ये मृत अवस्थेत पडलेले जनावर दिसत नाही. त्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळते. त्यामुळे अलिशान कारमधून किंवा बसमधून जाणाऱ्यांनी थोडा दुचाकीस्वाराचा विचार करावा, असे दुचाकीस्वारांनी प्रतिक्रिया व्यक्‍त केली. दरम्यान, पुणे – सातारा महामार्गावर अशाप्रकारचे अपघात वारंवार घडताना दिसतात. सुरक्षित आणि खड्डेविरहित महामार्गाची सेवा देण्याच्या नावाखाली वाहनचालकांकडून भरमसाट टोल वसूल केला जातो. मात्र, त्याप्रमाणात रस्त्याच्या सुरक्षिततेबाबत त्यांना गांभीर्य नाही. रस्त्यावर मृत अवस्थेतील जनावर उचलण्याची तसदीही अनेकवेळा घेतली जात नाही. तर महामार्गावर बाटल्या, अन्नपदार्थ, प्लॅस्टिक टाकणाऱ्यांवर कारवाईही होत नसल्यामुळे अपघात घडत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)