काळभोर : शिवसेनेचे हवेली तहसीलदारांना निवेदन
लोणी काळभोर- हवेली तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे, त्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या प्रती हेक्टरी नुकसान भरपाईत वाढ व्हावी, ही मदत त्वरित मिळावी, अशी मागणी शिवसेनेचे हवेली तालुकाप्रमुख प्रशांत काळभोर यांनी केली आहे. नुकताच हवेली तालुक्याच्या सर्वच भागात अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला आहे. अवकाळी पावसामुळे बळीराजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, या मागणीसाठी हवेली तालुका शिवसेनेच्या वतीने हवेली तहसीलदार कार्यालयावर एक मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी काळभोर बोलत होते.
ते म्हणाले की, शिवसेनेची ही मागणी त्वरित मान्य करुन शेतकरीहिताचे काम करावे. अन्यथा शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन हवेली तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात येईल, असा इशारा यावेळी काळभोर दिला आहे. मोर्चानंतर हवेलीचे तहसीलदार सुनील कोळी यांना एक निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर कटके, रमेश कोंडे, हवेली तालुका प्रमुख प्रशांत काळभोर, संदीप मोडक, जिल्हा संघटक रमेश भोसले, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक श्रद्धा कदम, प्रीतम उपलप, नितीन वाघ, मिलिंद हरगुडे, उपतालुका प्रमुख राजेश काळभोर, शरद माने, संतोष काकडे, बबन कुंजीर, यशवंत कारखान्याचे माजी संचालक प्रताप बोरकर, अण्णा टुले, सुवर्णा करंजावणे, संतोष कोतवाल, मच्छिंद सातव, गौरव काळभोर, संदीप सातव व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.