प्रशासनाचे दुर्लक्ष : डॉक्टरांची कमतरता, जागेचा अभाव
पिंपळे गुरव – पिंपरी-चिंचवड शहर स्मार्ट सिटी म्हणून नावारूपास येत आहे. परंतु दापोडी उपनगरात अजूनही प्राथमिक गरजांची पूर्तता होताना दिसून येत नाही. येथील दवाखाना, चेंबर, रस्ते, फुटपाथ याबाबत मोठ्या प्रमाणात समस्या आहेत. दापोडीतील बॉम्बे कॉलनीत महापालिकेचा जुना दवाखाना आहे. परंतु येथे एकच डॉक्टर असल्याने रुग्णांना उपचारासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागत आहे.
रुग्णांना बसण्यासाठी जागेचा अभाव आहे. तसेच रुग्णांना त्वरित उपचार मिळण्यासाठी आणखी काही डॉक्टरांची नियुक्त करणे गरजेचे आहे. दवाखान्यासाठी प्रशस्त इमारत असावी, अशी मागणी स्थानिक नागरिक व रुग्णांमधून होत आहे.
दापोडीत अतिशय कमी जागेत हा दवाखाना सुरू आहे. दवाखान्यात जाण्यासाठी प्रशस्त रस्ता नाही. दुचाकी गाडीच कशीबशी घेऊन जावे लागत आहे. दवाखान्यालगत नागरी वसाहत आहे. त्यामुळे दवाखान्याच्या परिसरात लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांचा वावर असतो. तेथेच रुग्णदेखील असतात त्यामुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. महापालिकेचा स्मार्ट सिटीत समावेश झाला; परंतु दापोडीतील दवाखान्याची स्थिती मात्र सुधारताना दिसत नाही.
दवाखाना छोटा असला तरी दापोडीतील नागरिक येथेच उपचार घेण्यासाठी येतात. 10 जुलैला तर 300 रुग्णांनी दवाखान्यात उपचार घेतल्याची नोंद आहे. एक डॉक्टर 300 रुग्णांची तपासणी करत असेल तर हे कितीपत योग्य आहे. सध्या करोनाचे मोठे संकट आहे. अतिशय छोट्या दवाखान्यात 300 रुग्ण येऊन उपचार घेत असतील तर फिजिकल डिस्टन्सचे काय होत असेल याची कल्पनाच न केलेली बरी. दापोडी परिसरात सर्वसामान्य नागरिक वास्तव्यास आहेत. ज्यांचे पोट हातावर आहे. करोनामुळे आर्थिक अडचण असल्याने खासगी दवाखान्यांपेक्षा सरकारी दवाखान्याला प्राधान्य दिले जात आहे. अशा काळात महापालिका येथे जास्तीचे डॉक्टर अथवा यंत्रणा उभा करत नसल्याने रुग्णांमध्ये नाराजी आहे.
उपलब्ध कर्मचारी
दापोडीतील दवाखान्यात केवळ एक डॉक्टर, एक नर्स, एक मावशी आणि एक वॉर्डबॉय आहे. वैद्यकीय कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे.
आजार अनेक, डॉक्टर एकच
दापोडीतील दवाखान्यात लहान बालकांपासून ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर महिलांपर्यंत सर्वांवर उपचार केले जातात. मात्र या सर्वांची तपासणी करण्यासाठी एकच डॉक्टर दवाखान्यात उपलब्ध आहे. त्यामुळे येथील रुग्णांना एक डॉक्टर कितपत न्याय देऊ शकेल हा संशोधनाचा विषय आहे. सध्या साथीच्या आजारामुळे रुग्णांची संख्या मोठी आहे. तसेच गरोदर महिलादेखील दर गुरुवारी तपासणीसाठी येत असतात. त्यामुळे येथील दवाखान्यात तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्त करणे गरजेचे आहे.
मी काही दिवस सुटीवर होतो. त्यामुळे सांगवी रुग्णालयातून पर्यायी डॉक्टर येत आहेत. काल त्यांना येण्यास उशीर झाल्याने रुग्णांची गैरसोय झाली. त्यामुळे आम्ही महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला आणखी काही डॉक्टरांची नियुक्त करण्याचे निवेदन दिले आहे. तसेच इतर कर्मचारीदेखील नियुक्त करावेत असे कळविले आहे.
– कुंदन पाटील, वैद्यकीय अधिकारी
माझ्या पत्नीला मी तपासणीसाठी घेऊन आलो आहे. परंतु गर्दी असल्याने बऱ्याच वेळेपासून आम्ही प्रतीक्षेत आहोत. एकीकडे करोनाची धास्ती तर दुसरीकडे दवाखान्याची अशी अवस्था. त्यामुळे महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
– अक्षय गायकवाड