अपूर्णतेतील प्रेरणा

आपले व्यक्तिमत्त्व हे अष्टपैलू असावे असे प्रत्येकाला वाटत असते. ज्यातून प्रत्येक क्षेत्रात आपण आपला ठसा उमटवून साजेसा नावलौकीक मिळवू शकतो, अशी आपली धारणा असते. मात्र, एकाचवेळी अनेक भिन्न भूमिकात आपण पारंगत असणे शक्‍य नसते; परंतु ते अशक्‍यही नाही हे आपण लक्षात घ्यायला हवे. कारण फार पूर्वी संत तुकारामांनी सांगितले आहे की,
असाध्य ते साध्य करिता सायास।
कारण अभ्यास तुका म्हणे।।
कोणतीही गोष्ट करणे शक्‍य आहे. त्यासाठी जिद्द, इच्छाशक्ती, सातत्य आणि सराव याची आवश्‍यकता असते. म्हणूनच एक व्यक्तिमत्त्व दोन भिन्न गोष्टीत पारंगत असणे नक्कीच कठीण नाही. कोणत्याही व्यक्तिमत्त्वाला दोन बाजू असतात. त्यातील एक बाजू असते पूर्णत्वाची तर दुसरी बाजू असते अपूर्णतेची. पूर्णत्वाची बाजू ती असते जी आपल्यातील कार्यकुशलता आणि कला कौशल्यातील निपुणता दर्शवित असते. तर जी दुसरी बाजू असते ज्यात आपण एखाद्या क्षेत्रात किंवा कार्यकौशल्यात आपल्या क्षमताना कुठेतरी मर्यादा येत असतात किंवा आपल्यातील काही कमतरतेमुळे आपण त्यात अपरिपूर्ण किंबहुना अपूर्ण ठरत असतो.

आपण ज्या बाबीत परिपूर्ण आहोत त्याबद्दल आपल्याला अभिमान वाटतो. परंतु जी गोष्ट आपल्या मर्यादा स्पष्ट करते त्याबद्दल आपण न्यूनगंड बाळगतो. त्या गोष्टीपासून दूर पळण्याचा प्रयत्न करतो. जितके शक्‍य होईल तितके ते टाळण्याचा प्रयत्न करतो आणि यामुळे आपण अमुक एखादी गोष्ट करू शकत नाही ही भावना मनाला वेदना देऊन जाते. इतरांना ती गोष्ट सहज करताना पाहून एक सल मनाला टोचत राहते.

अशावेळी आपण आपल्या कमतरतेकडे दुर्लक्ष न करता लक्ष केंद्रित करायला हवे. अपूर्णता ही पूर्णत्वाकडे नेणारी एक प्रेरणा आहे हे आपण लक्षात घ्यायला हवे. कमतरता जाणून घेणे हे यासाठी प्रथम गरजेचे आहे. ती कमतरता, दुर्बलता आपली ताकद कशी होईल याचा विचार करायला हवा. आज समाजात अशी अनेक उत्तुंग व्यक्तिमत्त्वे आहेत ज्यांनी आपल्या उणिवांवर काम करून त्या उणिवांना शक्‍तिस्थानात परावर्तीत केले आहे.

1968 साली अभिनेता बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून एक तरुण मुंबईच्या रस्त्यांवर फिरत होता. सिनेमासाठी ऑडीशन्स देत होता; परंतु तुझा आवाज अभिनयासाठी उत्तम नाही आणि तुझी उंची अभिनेत्यासाठी योग्य नाही असे कारण देऊन त्यांस नाकारले जात होते. मात्र, आपल्या उंचीप्रमाणेच आपल्या अभिनयाची उंची असेल हे त्यांनी मनाशी ठरविले आणि “हम जहॉं खडे होते है लाईन वहीसे शुरू होती है’ म्हणत बॉलिवूडचा शहेनशाह म्हणून ओळख मिळविली. हो हे तेच महानायक अमिताभ बच्चन.

1979 मध्ये जर्मनीमध्ये एका दाम्पत्याला पुत्ररत्न प्राप्त झाले; परंतु वयाच्या वाढीबरोबर शरीराची वाढ होऊनही ते मूल मानसिकदृष्ट्या कमजोर होते. घरचे आणि इतर लोक त्याला मतीमंद समजू लागले होते. मात्र, याच मुलाने पुढे सापेक्षवादाचा सिद्धांत मांडून एक महान शास्त्रज्ञ म्हणून जगाला आपली दखल घ्यायला लावली. आपल्या दुर्बलतेला आपले सामर्थ्य म्हणून जगासमोर आणणारे हे थोर व्यक्तिमत्त्व म्हणजेच अल्बर्ट आईनस्टाईन.

अशा अनेक आदर्शवत व्यक्‍ती आहेत ज्यांनी आपल्यातील उणिवांना आपले शक्‍तिस्थान बनवून यशाचे शिखर काबीज केले आहे. अपूर्णता (कमतरता) ही आपल्याकडे स्वतःला सिद्ध करण्यासाठी असलेली संधी असते. त्यावर मात करून त्या संधीचे सोने आपल्याला करता आले पाहिजे. कोणतीही सकारात्मक गोष्ट ही अपूर्णतेतूनच साध्य होत असते. शिक्षणाची अपूर्णता पूर्णत्वाकडे नेली की विद्याविभूषितेच्या पंक्तीत सन्मान मिळतो. स्वभावातील अपूर्णता पूर्ण झाली की नात्यांचा गंध दरवळतो. मनस्वास्थ्याची अपूर्णता संपली की सकारात्मक यशस्वी व्यक्तिमत्त्वाची जडण-घडण होते. कोणतीही गोष्ट किंवा क्रांती घडण्यास अपूर्णता कारणीभूत ठरत असते. सार्वभौमत्वाची अपूर्णता निर्माण झाल्यामुळेच स्वातंत्र्यचळवळीला प्रारंभ झाला आणि तो स्वातंत्र्यरूपाने पूर्णत्वास गेला. आपल्यातील अपूर्णतेला पूर्णत्वाकडे नेण्यासाठी आत्मविश्‍वासाने प्रयत्नांची पराकाष्ठा करू या. ही प्रेरणाच आपल्याला अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा साज चढविण्यास नक्कीच कारणीभूत ठरेल.

सागर ननावरे

Leave A Reply

Your email address will not be published.