भिगवण बाजारात स्थानिक माशांच्या दरात उच्चांकी वाढ
भिगवण-येथील बाजार समितीच्या मासळी बाजारात माशांच्या दराने उच्चांक गाठला आहे. सध्या उजनी धरणात भरपूर पाणी असूनही मासे सापडत नाहीत. माशांना मागणी असून स्थानिक माशांना उच्चांकी दर मिळत आहे. भिगवण परिसरात सर्वाधिक पकडला जाणारा मासा म्हणजे चिलापी.
येथील बाजार समितीच्या मासळीत एकूण विक्रीत चिलापी जातीच्या माशांचे प्रमाण सुमारे 70 ते 80 टक्के आहे. सुमारे अर्धा किलोपर्यंत वजनाचा चिलापी मासा मागील वर्षी सुमारे 40 ते 60 रु प्रति किलो मिळत होता. तो सध्या 100 ते 120 रूपये किलो दराने विकला जात आहे. त्यामुळे मागील वर्षीची तुलना करता दुपटीहुन अधिक दरवाढ झाल्याचे दिसून येत आहे.
- चिलापी व्यतिरिक्त माशांचा दर सुद्धा वाढलेला आहे. अधिक वजन व चांगल्या गुणवत्तेच्या माशांचा प्रति किलोचा दर पुढील प्रमाणे-
शिंगटा 160 ते 180,
गुगळी 300 ते 320,
मरळ 350 ते 420,
इंडीका 180 ते 200,
रोहू 200 ते 300,
कटला 120 ते 200
मागील वर्षी फेब्रृवारी महिन्यात भिगवणच्या मासळी बाजारात प्रतिदिन 20 टनांहुन अधिक मासळीची आवक होत होती. सध्या प्रतिदिन सुमारे 5 ते 6 टन एवढी आवक होत आहे. त्यामुळे मागणी अधिक व पुरवठा कमी अशी स्थिती असल्याने मासळीचे दर तेजीत आहेत. - सध्या धरणात पाण्याचा साठा मुबलक असला तरी मच्छिमारांना मासे सापडत नाहीत. त्यामुळे आवक घटून दरवाढ होत आहे.
-ज्ञानदेव नगरे, आडतदार. - भिगवणलाच होतेय माशांची आवक
महाराष्ट्रात पुणे, मुंबई, औरंगाबाद, कराड, पाचगणी, अहमदनगर इत्यादी ठिकाणी भिगवणच्या माशांना मागणी असते. त्याचप्रमाणे हावडा (कोलकाता), मद्रास आदी ठिकाणी भिगवणवरून मासे पाठविले जातात. सध्या मात्र भिगवणलाच आंध्र प्रदेशातून चिलापीची आवक होत आहे. बर्फात साठविलेला मोठ्या आकाराचा चिलापी जातीच्या माशाची भिगवणला आवक होत आहे. माशांची गुणवत्ता, चव यामुळे अधिकचा दर असूनही स्थानिक ग्राहकांची उजनी धरणातील माशांनाच मागणी आहे.