भिगवण -येथील बाजार समितीच्या मासळी बाजारात माशांच्या दराने उच्चांक गाठला आहे. सध्या उजनी धरणात भरपूर पाणी असूनही मासे सापडत नाहीत. माशांना मागणी असून स्थानिक माशांना उच्चांकी दर मिळत आहे. भिगवण परिसरात सर्वाधिक पकडला जाणारा मासा म्हणजे चिलापी.
येथील बाजार समितीच्या मासळीत एकूण विक्रीत चिलापी जातीच्या माशांचे प्रमाण सुमारे 70 ते 80 टक्के आहे. सुमारे अर्धा किलोपर्यंत वजनाचा चिलापी मासा मागील वर्षी सुमारे 40 ते 60 रु प्रति किलो मिळत होता. तो सध्या 100 ते 120 रूपये किलो दराने विकला जात आहे. त्यामुळे मागील वर्षीची तुलना करता दुपटीहुन अधिक दरवाढ झाल्याचे दिसून
येत आहे.
मागील वर्षी फेब्रृवारी महिन्यात भिगवणच्या मासळी बाजारात प्रतिदिन 20 टनांहुन अधिक मासळीची आवक होत होती. सध्या प्रतिदिन सुमारे 5 ते 6 टन एवढी आवक होत आहे. त्यामुळे मागणी अधिक व पुरवठा कमी अशी स्थिती असल्याने मासळीचे दर तेजीत आहेत.
सध्या धरणात पाण्याचा साठा मुबलक असला तरी मच्छिमारांना मासे सापडत नाहीत. त्यामुळे आवक घटून दरात मोठी वाढ झाली आहे.
-ज्ञानदेव नगरे, आडतदार.