चेन्नई – प्राप्तिकर विभागाच्या छाप्यांमुळे द्रमुकला मोफत प्रसिद्धी मिळाली. त्या छापासत्राचा पक्षाच्या मनोधैर्यावर कुठलाही परिणाम झालेला नाही, अशी प्रतिक्रिया द्रमुकचे प्रमुख एम.के.स्टॅलिन यांचे पुत्र आणि अभिनेते उदयनिधी मारन यांनी दिली.
तामीळनाडूत सध्या विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. अशातच त्या राज्यात प्राप्तिकर विभागाने शुक्रवारी छापासत्र हाती घेतले. द्रमुकच्या काही नेत्यांबरोबरच स्टॅलिन यांच्या विवाहित कन्येच्या निवासस्थानीही छापे टाकण्यात आले. त्यावर प्रथमच निवडणूक रिंगणात उतरलेल्या उदयनिधी यांनी प्रतिक्रिया दिली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे पुत्र जय यांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यांची संपत्ती 120 कोटी रूपयांपर्यंत पोहचली आहे, असा दावाही त्यांनी केला. द्रमुकमध्ये घराणेशाहीच्या राजकारणाला महत्व असल्याची टीका भाजपकडून केली जात आहे. त्याचा समाचार घेताना उदयनिधी म्हणाले, मला निवडून द्यायचे की नाही याचा निर्णय माझ्या मतदारसंघातील जनता घेईल. माझा मोठ्या मताधिक्याने विजय होईल.