मुंबई – प्राप्तीकर विभागाने आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित काही उद्योगांवर आणि रिअल इस्टेट विकसकांवर छापे घातले. करचुकवेगिरीच्या आरोपावरून प्राप्तीकर विभागाने हे छापे घातले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, सातारा आणि गोव्यातील काही शहरांमधील काही ठिकाणांवर हे छापे घातले गेले. ढिबी रिऍल्टी, शिवालिक, जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना आणि अजित पवार यांच्या भगिनींशी संबंधित काही उद्योगांवर हे छापे घातले गेले, असे सूत्रांनी सांगितले. काछाप्यांमधून काही कागदपत्रे ताब्यात घेतली गेली आणि त्यांचा अभ्यास केला जात आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
या कारवाईवर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली असून नाराजी आणि संताप व्यक्त केला आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. माझ्याशी संबंधित कंपन्यांवर धाड टाकली याचं काही वाटत नाही. पण फक्त रक्ताचं नातं आहे म्हणून राजकारणाशी, कंपन्यांशी दुरान्वये संबंध नसलेल्या माझ्या बहिणींवर कारवाई केली जाते याचं वाईट वाटतं, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी जाहीर केली आहे.
जुलै महिन्यातच सक्तवसुली संचलनालयाने साताऱ्यातील चिमणगाव-कोरेगाव येथील जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची 65 कोटी रुपयांची जमीन, इमारत, प्लॅन्ट आणि उपकरणे जप्त केली होती. मनी लॉंडरिंग प्रतिबंधक कायद्याखाली ही कारवाई करण्यात आली होती. सहकारी तत्वावर चालवला जाणारा हा साखर कारखाना अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीचा असल्याचे “ईडी’ने म्हटले होते. जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची मालकी सध्या गुरू कमोडिटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडकडे आहे. मात्र ही कंपनी बनावट असल्याचा आरोप आहे. या कंपनीने हा कारखाना जरंडेश्वर शुगर मिल्स प्रा. लि. हा भाडेतत्वाने दिला आहे, असा दावा “ईडी’ने आपल्या निवेदनामध्ये केला आहे.
जरंडेश्वर कारखान्याचे बहुतेक समभाग स्पार्कलिंग सॉईल प्रा.लि. कडे आहेत. ही कंपनी अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा अजित पवार यांच्याशी संबंधित आहे, असा तपास संस्थांचा दावा आहे. मात्र अजित पवार यांनी काहीही गैरव्यवहार केल्याचा आरोप फेटाळून लावला आहे.
“ईडी’ने ही कारवाई महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेतील गैरव्यवहाराच्या तपासादरम्यान केली होती. जरंडेश्वर कारखान्याची तत्कालिन अधिकाऱ्यांकडून आणि बॅंकेच्या संचालकांकडून चुकीच्या पद्धतीने अगदी कवडीमोल किंमतीत पवार यांच्या नातेवाईकांना आणि खासगी व्यक्तींना विक्री करण्यात आली. या व्यवहारात कायद्यामुसार आखून दिलेली प्रक्रिया डावलण्यात आली आणि कारखान्याची विक्री अत्यंत अल्प दरात लिलावातून करण्यात आली असल्याचे “ईडी’ने म्हटले आहे. हा व्यवहार झाला तेंव्हा अजित पवार बॅंकेच्या संचालक मंडळावरील सर्वात प्रभावी सदस्य होते.
गुरू कमोडिटीने कारखाना विकत घेतला आणि लगेचच जरंडेश्वर शुगर मिल्सला भाडेतत्वाने दिला. कारखाना विक्रीच्या व्यवहारातील बहुतांश रक्कम जरंडेश्वर शुगर मिल्सकडूनच देण्यात आली होती. या कंपनीला ही रक्कम अजित पवार यांच्याच स्पार्कलिंग सॉईल प्रा. लि. कडून मिळाली होती, असा दावाही “ईडी’ने केला आहे. “ईडी’ने जप्त केलेला कारखाना पूर्वी जरंडेश्वर शुगर मिल्स प्रा.लि. च्या नियंत्रणात होता, असेही “ईडी’ने म्हटले आहे.