सोनु सूदवरही आयकर विभागाची वक्रदृष्टी ; सहा ठिकाणांचा  सर्व्हे

नवी दिल्ली – देशभरातील हजारो गरजु लोकांना मोठ्या प्रमाणात मदत केल्याच्या कारणावरून देशभर चर्चेचा विषय ठरलेला अभिनेता सोनु सूद याच्यावरही आता आयकर विभागाची वक्रदृष्टी पडली आहे. आयकर विभागाने सोनु सूदशी संबंधीत सहा ठिकाणांवर सर्व्हे केल्याचे स्पष्ट झाले आहे.

या सर्व्हेत संबंधीत व्यक्तीचे प्रत्यक्ष उत्पन्न आणि कागदपत्रांमध्ये दाखवलेले उत्पन्न याच्याशी संबंधीत माहिती मिळवली जाते. हा प्रत्यक्ष छापा नसतो फक्त ती प्राथमिक स्वरूपाची माहिती मिळवण्यासाठी केलेला प्रयत्न असतो. सोनु सूद हे अलिकडेच आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या संपर्कात आले आहेत.

दिल्ली सरकारच्या एका योजनेचे ब्रॅंड ऍम्बेसिडर म्हणूनही त्यांनी काम करणे सुरू केले आहे. ही योजना गरीब विद्यार्थ्यांना करिअर विषयक मार्गदर्शन करण्याची आहे. त्याद्वारे गरीब वर्गातील हजारो मुलांना त्यांच्या भविष्याशी संबंधीत योग्य मार्गदर्शन होणार आहे. देश के मेंटॉर असे या योजनेचे नाव असून त्याच्या ब्रॅड अम्बेसिडर पदी सूद यांची केजरीवालांनी नियुक्ती केली आहे.

त्यामुळे सूद यांना केजरीवालांशी असलेली जवळीक भोवली असल्याचाही निष्कर्ष काढला जात आहे.सोनु सूद यांनी देशातील पहिल्या लॉकडाऊनच्या काळात हजारो स्थलांतरीत मजुरांना मदतीचा हात दिला होता. अगदी अलिकडे त्यांनी उत्तरप्रदेशात डेंगी सारख्या तापाने आजारी असलेल्या मुलांच्या मदतीचेही काम केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.