एकाच वेळी पुणे, मुंबई, दिल्लीमध्ये कारवाई
पिंपरी – हाऊस किपींग, आरोग्य आणि कृषी क्षेत्रात काम करत असलेल्या नामवंत भारत विकास ग्रुप (बीव्हीजी) कंपनीच्या पिंपरी-चिंचवड येथील मुख्य कार्यालयासह मुंबई आणि दिल्लीतील कार्यालयावर बुधवारी (दि. 6) एकाचवेळी धाडी टाकण्यात आल्या. आयकर विभागाने केलेल्या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली असून, रात्री उशीरापर्यंत ही कारवाई सुरू होती.
बीव्हीजी ग्रुपचे पिंपरी-चिंचवड शहरातील चिंचवड स्टेशन परिसरात जुन्या पुणे-मुंबई महामार्गाशेजारी “बीव्हीजी हाऊस’ हे मुख्य कार्यालय आहे. सकाळी दहाच्या सुमारास या कार्यालयावर आयकर विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अचानकपणे धाड टाकत कार्यालयाचा ताबा घेतला. कार्यालयात असलेल्या कर्मचाऱ्यांना बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला, तसेच कर्मचाऱ्यांचे मोबाईल फोनही काढून घेण्यात आले. ही कारवाई सुरू असताना “बीव्हीजी’च्या कार्यालयासमोर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. बीव्हीजी ग्रुपच्या माध्यमातून देशातील विविध संस्थांसह शासकीय कार्यालयांना “हाऊस किपींग’ची सुविधा पुरविली जाते. यामध्ये राष्ट्रपती कार्यालय, संसद भवन, रेल्वे, बालाजी मंदिरासह अन्य अनेक मोठ्या कार्यालयांचा समावेश आहे. हाऊस किपींग बरोबरच ही कंपनी आरोग्य, वैद्यकीय, कृषी क्षेत्राशी संबंधित किटकनाशके, बी-बियाणे या क्षेत्रातही कार्यरत आहे.
आज सकाळी आयकर विभागाच्या सुमारे चाळीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी एकाच वेळी ही कारवाई केली. पिंपरी-चिंचवडमधील कार्यालयासह मुंबई आणि दिल्लीतील कार्यालयातवरही धाडी टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कारवाई संदर्भातील माहिती उपलब्ध करून देण्यास असमर्थता दर्शविली. तसेच माहिती देण्यास नकार दिला.
आयकर विभागाला संपूर्ण सहकार्य – बीव्हीजी
आयकर विभागाचे अधिकारी त्यांच्या नियमित प्रशासकीय प्रक्रियेचा भाग म्हणून बीव्हीजी कार्यालयात आले आहेत. त्यांना आम्ही संपूर्ण सहकार्य करत आहोत, असे बीव्हीजी इंडियाचे अध्यक्ष हणमंत गायकवाड यांनी दैनिक प्रभातशी बोलताना सांगितले. तळागाळातल्या सुमारे 75 हजार सर्वसामान्य माणसांना रोजगार देणाऱ्या आमच्या समुहात कोणतेही चुकीचे काम होत नाही, सर्व बाबी पारदर्शक असून, “बीव्हीजी’ची सामाजिक परिवर्तनाशी बांधिलकी आहे. म्हणूनच विविध समाजहिताच्या क्षेत्रात बीव्हीजी समूह मोलाचे योगदान देत आहे, असे गायकवाड म्हणाले. आयकर अधिकारी प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करत आहेत. त्याला छापा किंवा धाड म्हणता येत नाही. आयकर अधिकाऱ्यांना बीव्हीजीचे सर्व कर्मचारी संपूर्ण सहकार्य करत आहेत, असेही गायकवाड यांनी सांगितले.