प्राप्तीकर विभागाचे महाराष्ट्र, कर्नाटक. उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये छापे

नवी दिल्ली  – प्राप्तीकर विभागाने गेल्या आठवड्यात गुरूवारी मुंबई, पुणे, नोयडा आणि बंगळूरू यांच्यासह अनेक प्रमुख शहरांमधील 37 व्यावसायिकांवर तपास आणि जप्ती कारवाया केल्या. हे व्यावसायिक गट/व्यक्ती केबल उत्पादन, स्थावर मालमत्ता, वस्त्रनिर्माण, छपाई यंत्रसामग्री, हॉटेल्स, मालवाहतूक, इत्यादी विविध प्रकारच्या उद्योगांमध्ये गुंतलेले आहेत.

तपास कारवाईदरम्यान अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे, सुटी पत्रके, डायऱ्या, ईमेल्स आणि इतर डिजिटल पुरावे इत्यादी सामग्री हाती लागली आहे. सापडलेल्या साहित्यावरून या लोकांकडे प्राप्तीकर विभागाकडे नोंद नसलेली अनेक परदेशी बॅंक खात्यांची मालकी तसेच स्थावर मालमत्ता असल्याचे दिसून येत आहे.

या व्यक्तींनी त्यांची बेहिशेबी मालमत्ता सुरक्षित ठेवण्यासाठी दुबईस्थित आर्थिक सेवा पुरवठादाराच्या सेवांचा वापर करून मॉरीशस, संयुक्त अरब अमिरात, ब्रिटीश वर्जिन बेटे इत्यादी करविषयक सवलती असलेल्या देशांमध्ये परदेशी कंपन्या आणि विश्वस्त संस्थांचे संदिग्ध आणि गुंतागुंतीचे जाळे निर्माण केले.

दुबईस्थित आर्थिक सेवा पुरवठादाराने या गट आणि व्यक्तींच्या बॅंक खात्यांमध्ये एका दशकाच्या अवधीत जमा केलेली रक्कम 10 कोटी अमेरिकी डॉलर्स (सुमारे 750 कोटी भारतीय रुपये)हून अधिक आहे असे निदर्शनास आले होते आणि आणि हा पैसा स्वित्झर्लंड, संयुक्त अरब अमिरात, मलेशिया आणि इतर अनेक देशांमधील बॅंक खात्यांमध्ये जमा स्थितीत पडून राहिलेला आढळून आला.

तपास कार्यात हाती लागलेल्या पुराव्यांवरून असे दिसून आले की, परदेशातील हा लपवून ठेवलेला पैसा या गटांनी परदेशातील बंद कंपन्यांच्या नावावर युनायटेड किंगडम, पोर्तुगाल, संयुक्त अरब अमिरात यासारख्या अनेक देशांमध्ये स्थावर मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरला आणि परदेशी बॅंक खात्यांतून तो पैसा प्रवर्तक किंवा परदेशातील त्यांच्या कुटुंबियांचे व्यक्तिगत खर्च भागविण्यासाठी घेतला असे भासवून त्यांच्या भारतीय कंपन्यांकडे वळविण्यात आला.

या तपास कारवाई दरम्यान, रोख रक्कम मिळविण्यासाठी पुरवठादारांना दिलेली खोटी देयके, बेहिशेबी रोख रकमेचा व्यय, हवाला व्यवहार, अधिकच्या पावत्या तयार करणे अशा गैरव्यवहारांशी संबंधित पुरावे देखील सापडले आहेत. तसेच निवासी आणि व्यावसायिक ठिकाणांहून अनुक्रमे बेहिशेबी रोख रक्कम तसेच 2 कोटी रुपयांहून अधिक किंमतीचे दागिने ताब्यात घेण्यात आले आहेत. पुढील तपास सुरू आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.