Incom Tax Raids Pushpa 2 Director Sukumar: दक्षिणेतील ब्लॉकबस्टर चित्रपट पुष्पा 2 चे दिग्दर्शक सुकुमार यांच्याबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. बुधवारी आयकर विभागाच्या पथकाने त्यांच्या घरावर आणि कार्यालयावर छापे टाकले. ‘साक्षी पोस्ट’च्या वृत्तानुसार, प्राप्तिकर विभागाच्या पथकाने छापा टाकला तेव्हा सुकुमार हैदराबाद विमानतळावर होते. आयकर टीमने डायरेक्टला विमानतळावरून उचलले आणि त्यांच्या घरी नेले. हा छापा का टाकला जात आहे, याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. तसेच अधिकाऱ्यांकडून सध्या कोणतेही निवेदन जारी करण्यात आलेले नाही.
दिल राजूच्या घरावर टाकला होता छापा –
हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, मंगळवारी प्राप्तिकर विभागाने राम चरणच्या ‘गेम चेंजर’चा निर्माता दिल राजू यांच्या घरावर छापा टाकला होता. यानंतर मैत्री मुव्ही मेकर्सचे सीईओ आणि कंपनीच्या इतर सदस्यांच्या घरावर छापे टाकल्याची बातमी आली. आता बातमी अशी आहे की, आयकर विभागाची टीम बुधवारी दिग्दर्शक सुकुमार यांच्या घरी आणि कार्यालयात पोहोचली. दिग्दर्शकांच्या मालमत्तेवर अधिकाऱ्यांनी छापे टाकले आहेत.
अनेक तास सुरू होता हा छापा –
आयकर विभागाच्या पथकाने बुधवारी सकाळी ही कारवाई केल्याचे ‘साक्षी पोस्ट’च्या वृत्तात म्हटले आहे. या काळात अधिकाऱ्यांनी अनेक तास तपासणी केली. आयकर अधिकाऱ्यांनी सुकुमारला हैदराबाद विमानतळावरून थेट त्याच्या घरी नेल्याचे सांगण्यात येत आहे. या छाप्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पुष्पा 2 चा काही संबंध आहे का?
दिग्दर्शक सुकुमार यांनी अल्लू अर्जुन स्टारर ब्लॉकबस्टर चित्रपट पुष्पा 2 चे दिग्दर्शन केले आहे. हा छापा चित्रपटाशी संबंधित आहे की नाही हे अद्याप समोर आलेले नाही. पुष्पा 2 गेल्या वर्षी 5 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 1800 कोटींहून अधिक कमाई करून हिंदी चित्रपटसृष्टीचे सर्व रेकॉर्ड तोडले आहेत.