पुणे -करोनातून बऱ्या होणाऱ्या गंभीर रुग्णांना म्युकरमायकोसिस (काळी बुरशी) या जीवघेण्या आजाराचा सामना करावा लागत आहे. त्यातच, या आजारासाठीचे उपचार महागडे असल्याने सर्वसामान्यांना परवडत नाही. त्यामुळे या आजाराचा समावेश महापालिकेच्या शहरी-गरीब योजनेत केला जाणार आहे.
तसेच या आजारावरील रुग्णांना उपचारासाठी 3 लाखांचा खर्च महापालिकेकडून करण्यात येणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. याशिवाय, या रुग्णांवर उपचार करण्यासाठी महापालिकेच्या शिवाजीनगरमधील दळवी हॉस्पिटल येथे 20 बेडची सुविधाही तातडीने उपलब्ध करून दिली जाणार आहे. या आजाराचे रुग्ण वाढत आहेत. मात्र, आर्थिक दुर्बल घटकांमधील नागरिकांना या आजाराचे उपचार परवडणारे नाहीत.
महापालिकेकडून शहरात आर्थिक दुर्बल घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या शहरी-गरीब योजनेंतर्गत 1 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या अथवा पिवळे रेशनकार्ड असलेल्या नागरिकांना 1 लाखांपर्यंत, तर काही दुर्धर आजारांसाठी 2 लाखांपर्यंतचे उपचार महापालिकेच्या पॅनेलवरील रुग्णालयात दिले जातात. शहरात पालिकेच्या पॅनेलवर सुमारे 140 रुग्णालये आहेत.
त्यामुळे म्युकरमायकोसिससाठी या योजनेंतर्गतच सर्वसामान्यांना उपचार मिळावेत यासाठी महापौरांनी मंगळवारी महापालिका प्रशासनाची बैठक घेतली. यावेळी, हा आजार, त्यासाठीच्या उपचाराचा खर्च तसेच इतरबाबी लक्षात घेऊन शहरी-गरीब योजनेत म्यूकरमायकोसिसचा समावेश करून 3 लाखांपर्यंतचा खर्च महापालिका देणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेली तरतूदही प्रशासनास उपलब्ध करून दिली जाणार आहे. स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
दळवी रुग्णालयात 20 बेड
म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचारासाठी महापालिकेच्या दळवी रुग्णालयात 20 बेड राखीव ठेवले जाणार आहेत. त्यासाठीचे नियोजनही तातडीने करण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत. तसेच या रुग्णांवरील उपचारासाठी लागणारी औषधे आणि नाक, कान, घसा तज्ज्ञांची तातडीने या हॉस्पिटलमध्ये नियुक्ती करण्यासह आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याबाबत सूचना केल्याचे महापौरांनी स्पष्ट केले.