सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरले
पुणे (प्रतिनिधी) – निसर्ग चक्रीवादळामुळे पुणे शहर आणि उपनगरात मध्यरात्री पावसाचा जोर वाढला त्यानंतर सकाळी तर वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली. या वादळीपावसामुळे शहरातील सखल भागांमध्ये पाणी शिरले असून झाडपडीच्या दुपारपर्यत पंचवीसहून अधिक घटना घडल्या.
पुणे शहरात गेले दोन दिवसापासून ढगाळ वातावरण होते. तर अधून-मधून पावसाच्या सरी सुद्धा कोसळत होत्या. संध्याकाळ पासून शहरात पावसाचा जोर वाढू लागला होता. रात्री अकरा नंतर पावसाने थोडी उघडीप दिली. पण मध्यरात्रीपासून पुन्हा जोर वाढला पावसाबरोबर वादळी वारे सुद्धा वाहत होते. या वाऱ्यामुळे अनेक भागात झाडपडीच्या घटना घडल्या. वादळी पावसामुळे रात्रीपासूनच शहराच्या सखल भागात पाणी शिरले होते.